
जळगाव, 28 मे (हिं.स.) जिल्हा कारागृहामधून एक धक्कादायक घटना समोर आली. कैद्यांमधील जुना वाद पुन्हा उफाळून आल्याने एका कैद्यावर जीवघेणा हल्ला झाला. या मारहाणीत एक कैदी गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक ०८ मध्ये ही घटना घडली. राजू नाना काळे (वय २९, रा. वाल्मीक नगर, जळगाव) हा कैदी बॅरेकमध्ये असताना संशयित आरोपी श्याम तुकाराम सुर्यवंशी (रा. जैनाबाद, जळगाव) याने जुन्या वादाच्या कारणावरून त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत होताच आरोपीने राजू काळे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याला जोरात भिंतीवर ढकलल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कारागृह प्रशासनाने तत्काळ जखमी कैद्याला उपचारासाठी हलवले.
या प्रकरणी जखमी कैद्याच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सोनवणे करीत आहेत. कारागृहातील सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत या घटनेनंतर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर