
अमरावती, 29 मे (हिं.स.) : तालुक्यातील पापळ येथे एका कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाने धाड टाकून अंदाजे 30 टन निकृष्ट दर्जाच्या रासायनिक खतांचा साठा जप्त केला. या प्रकरणी कृषी केंद्र संचालकासह संबंधितांविरुद्ध नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पापळ येथील ‘राधे राधे कृषी सेवा केंद्र’च्या गोदामात विनापरवाना निकृष्ट दर्जाचे रासायनिक खत साठवून विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती नांदगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा खत निरीक्षक गजानन गिरे यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पथकासह संबंधित कृषी केंद्रावर धाड टाकली.
तपासणीदरम्यान गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात विनापरवाना साठवलेले निकृष्ट दर्जाचे रासायनिक खत आढळून आले. अधिकाऱ्यांनी अंदाजे 30 टन खतांचा साठा जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणी कृषी अधिकारी गजानन गिरे यांच्या तक्रारीवरून नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात भारत ऍग्रो एक्सपोर्ट खली, गुजरात येथील उत्पादन व्यवस्थापक मनमत रामदाम दमाने (रा. पुणे) तसेच कृषी केंद्र संचालक पवनकुमार गोवर्धन येवतकर (रा. पापळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, निकृष्ट खतांच्या विक्रीमुळे पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने अधिक कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी