जळगाव - अवैध गोवंश कत्तल प्रकरण उघड; ९ आरोपींवर गुन्हे
जळगाव, 29 मे (हिं.स.)नशिराबाद येथील फातेमा नगर परिसरात सुरू असलेल्या अवैध गोवंश कत्तल प्रकरणावर नशिराबाद पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत ९ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत तब्बल १२ लाख २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अस
जळगाव - अवैध गोवंश कत्तल प्रकरण उघड; ९ आरोपींवर गुन्हे


जळगाव, 29 मे (हिं.स.)नशिराबाद येथील फातेमा नगर परिसरात सुरू असलेल्या अवैध गोवंश कत्तल प्रकरणावर नशिराबाद पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत ९ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत तब्बल १२ लाख २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे.

पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैधरीत्या सुरू असलेल्या गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या विशेष पथकाने फातेमा नगर भागात अचानक छापा टाकला. पोलिसांनी परिसराला वेढा घालत कारवाई सुरू केली.

यावेळी परवीन कुरेशी, मुक्तार कुरेशी यांच्यासह इतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले. काही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती समोर आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.कारवाई दरम्यान घटनास्थळावरून गायी, बैल, गोऱ्हे, लहान वासरे, मोठ्या प्रमाणात गोवंशीय मांस तसेच वाहतूक व विक्रीसाठी वापरण्यात येणारी वाहने जप्त करण्यात आली. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे १२ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर साहित्य हस्तगत करण्यात आल्याने परिसरात दिवसभर चर्चेला उधाण आले होते.या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हरेष पाटील करीत आहेत. या प्रकरणातील इतर संबंधितांचा शोध घेण्याचे कामही सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. दरम्यान, कत्तलीसाठी आणण्यात आलेली काही गायी, वासरे व इतर जनावरे सुरक्षितरित्या कुसुंबा येथील रतनलाल सी. बाफना गोशाळा येथे हलविण्यात आली आहेत. जनावरांची योग्य काळजी घेण्यात येत असून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण कारवाईत “गोरक्ष नशिराबाद” यांच्या सहकार्यामुळे मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे सांगण्यात आले. पोलिस आणि गोरक्षकांच्या संयुक्त सहकार्यामुळे ही कारवाई प्रभावीपणे पार पडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande