म्यानमारचे राष्ट्रपती मिन आँग ह्लाइंग ३० मे पासून भारत दौऱ्यावर
नवी दिल्ली , 29 मे (हिं.स.)।म्यानमारचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मिन आंग ह्लाइंग हे 30 मे ते 3 जून 2026 दरम्यान भारताच्या चार दिवसीय अधिकृत दौऱ्यावर येणार आहेत. याबाबतची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नि
म्यानमारचे राष्ट्रपती मिन आँग ह्लाइंग ३० मे पासून भारत दौऱ्यावर


नवी दिल्ली , 29 मे (हिं.स.)।म्यानमारचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मिन आंग ह्लाइंग हे 30 मे ते 3 जून 2026 दरम्यान भारताच्या चार दिवसीय अधिकृत दौऱ्यावर येणार आहेत. याबाबतची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून होत असलेला हा दौरा राष्ट्राध्यक्ष मिन यांच्या सध्याच्या पदावरील भारताचा पहिलाच दौरा असेल. त्यांच्या सोबत अनेक कॅबिनेट मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योगजगताशी संबंधित उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळही भारतात येणार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, राष्ट्राध्यक्ष मिन 1 जून रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या चर्चेत भारत आणि म्यानमार यांच्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सभ्यताविषयक संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच राष्ट्राध्यक्ष मिन हे एका बिझनेस फोरममध्येही सहभागी होणार आहेत.

दौऱ्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष मिन 30 मे रोजी बिहारमधील बोधगया येथे भेट देणार असून, तेथील धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या स्थळांना भेट देणार आहेत. त्यानंतर 2 जून रोजी ते मुंबईत येणार असून, उद्योग आणि व्यापार क्षेत्राशी संबंधित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याबरोबरच काही औद्योगिक प्रकल्पांना भेट देणार आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारताच्या ‘नेबरहूड फर्स्ट’, ‘अॅक्ट ईस्ट’ आणि ‘महासागर’ धोरणांमध्ये म्यानमारला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे हा दौरा दोन्ही देशांमधील बहुआयामी संबंध अधिक दृढ आणि मजबूत करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

राष्ट्राध्यक्ष मिन हे यापूर्वी 1 जून रोजी होणाऱ्या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स (आयबीसीए) शिखर परिषदेत सहभागी होणार होते. मात्र, आफ्रिका खंडातील काही देशांमध्ये इबोला विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे चौथी भारत-आफ्रिका फोरम शिखर परिषद पुढे ढकलण्यात आली. आयबीसीए परिषदही त्याच कार्यक्रमासोबत आयोजित करण्यात येणार असल्याने तीही स्थगित करण्यात आली. तरीदेखील, म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष अधिकृत भारत दौऱ्यावर येणार आहेत.

हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा एप्रिल 2026 मध्ये परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी म्यानमारला भेट दिली होती आणि राष्ट्राध्यक्ष मिन यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थिती लावली होती. त्या वेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष मिन यांची भेट घेऊन द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी भारताची बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राष्ट्राध्यक्ष मिन यांना पदभार स्वीकारल्याबद्दल शुभेच्छा संदेशही सुपूर्द केला होता. आता राष्ट्राध्यक्षांच्या भारत दौऱ्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांना नवी गती मिळेल, असे मानले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande