
नागपूर, 29 मे (हिं.स.) : स्वातंत्र्याच्या वेळी झालेली देशाची फाळणी ही गेल्या शतकातील सर्वाधिक वेदनादायी बाब होती. त्यावेळी संघ आजच्या इतका सक्षम आणि मजबूत स्थितीत नव्हता. अन्यथा देशाची फाळणी टळली असती असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. नागपूरच्या सिव्हील लाईन्स परिसरातील चिटणवीस केंद्रात शुक्रवारी आयोजित संगोष्ठीत ते बोलत होते. या कार्यक्रमाला विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी सुनील आंबेकर म्हणाले की, स्वातंत्र्याच्या वेळी 1947 मध्ये संघ हवा तितका मजबूत नव्हता. मात्र तरीदेखील हिंदूचे संरक्षण, त्यांचे पुनर्वसन यासाठी संघाने पूर्ण ताकदीने प्रयत्न केले होते. फाळणीमुळे तत्कालिन यंत्रणेविरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष होता. त्यामुळेच ते स्वातंत्र्यलढ्याचे ‘हिरो’ होते त्यांची फाळणीनंतर नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली होती. त्यावेळी काही राजकीय पक्ष संघाला राजकीय स्पर्धक समजू लागले होते. त्यावेळी संघाचे रेकॉर्ड गोळा करण्याचे आदेश विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आले होती. त्यानंतर राजकीय कारणांमुळेच संघावर पहिली बंदी लावण्यात आली होती, असा दावा आंबेकर यांनी केला. राजकीय स्वार्थातून अनेकदा संघाबाबत विविध अपप्रचार करण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात संघाकडून कुणाचाही द्वेष करण्यात येत नाही व कुणाशीही शत्रुत्व वगैरेदेखील नाही. संघ सर्वांनाच आपले मानतो व समाजातील सर्वच तत्वांशी संवाद प्रस्थापित करण्याची भावना आहे. त्यामुळेच संघ सर्वांशी संवाद व चर्चेसाठी कामय तयार असतो, असेदेखील आंबेकर यांनी सांगितले.
हल्ली समाजात काही लोक “जयभीम-लालसलाम” अशा घोषणा करताना दिसतात. प्रत्यक्षात जोपर्यंत जगात गौतम बुद्ध यांनी दाखविलेला शांतीचा मार्ग आहे तोपर्यंत कार्ल मार्क्स किंवा इतरांच्या मार्गावर जाण्याची आवश्यकता नाही असे खुद्द डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. त्यांचे मौलिक विचार लक्षात घेतले पाहिजे. कम्युनिस्ट आणि समाजवादी हे संविधानाचे सर्वात मोठे शत्रू आहेत, असेदेखील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेतील उद्बोधनात म्हणाले होते. विशेष म्हणजे संविधान आणि संघ यांना बाबासाहेबांनी कधीच एकमेकांच्या विरोधात असल्याचे म्हंटले नाही. इतकेच नव्हे तर कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांवर त्यांनी टीका केली, परंतु, संघाला त्यांनी कधीही संविधानाच्या विरोधात मानले नसल्याचे आंबेकर यांनी अधोरेखित केले.
जगातील संघर्षाच्या स्थितीमुळे देशात काही क्षेत्रांत संकट जाणवत आहे. मात्र अशा स्थितीत सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. दुसऱ्या देशातील वस्तुंची गरजच कमी पडली पाहिजे असे प्रयत्न झाले पाहिजेत. संकटाच्या संवेदनशील परिस्थितीत राजकारण मध्ये आणायला नको, असे आंबेकर यांनी नमूद केले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी