शेअर बाजारात अस्थिर सुरुवातीनंतर तेजी; आयटी शेअर्सचा दमदार परफॉर्मन्स
नवी दिल्ली, 29 मे (हिं.स.) : देशांतर्गत शेअर बाजारात आज सकाळच्या व्यवहारात मोठी अस्थिरता दिसून आली. सुरुवातीला संमिश्र कल राहिल्यानंतर खरेदी आणि विक्रीच्या सततच्या चढ-उतारांमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी तेजीकडे झुकता कल दाखवला.
Stock Market Early Trade


नवी दिल्ली, 29 मे (हिं.स.) : देशांतर्गत शेअर बाजारात आज सकाळच्या व्यवहारात मोठी अस्थिरता दिसून आली. सुरुवातीला संमिश्र कल राहिल्यानंतर खरेदी आणि विक्रीच्या सततच्या चढ-उतारांमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी तेजीकडे झुकता कल दाखवला.

बाजार उघडल्यानंतर सुरुवातीला खरेदीचा जोर दिसला, त्यानंतर काही वेळ विक्रीचा दबाव वाढल्याने निर्देशांकात घसरण झाली. मात्र, अर्ध्या तासानंतर पुन्हा खरेदी वाढल्याने बाजारात सुधारणा झाली. पहिल्या तासानंतर सेन्सेक्स 0.28 टक्क्यांनी आणि निफ्टी 0.15 टक्क्यांनी वधारला होता.

बीएसई सेन्सेक्स 120.71 अंकांच्या वाढीसह 75,988.51 अंकांवर उघडला. व्यवहारादरम्यान तो 76,220.02 अंकांच्या उच्चांकापर्यंत गेला, तर विक्रीच्या दबावामुळे 75,817.50 अंकांपर्यंत घसरला. सकाळी 10:15 वाजता सेन्सेक्स 214.96 अंकांनी वाढून 76,082.76 अंकांवर व्यवहार करत होता.

एनएसई निफ्टीनेही सुरुवातीला हलकी घसरण दाखवली. तो 5 अंकांच्या घसरणीसह 23,902.15 वर उघडला होता. त्यानंतर खरेदीच्या जोरावर तो 24,002.80 अंकांपर्यंत पोहोचला, मात्र पुन्हा विक्रीचा दबाव वाढल्याने 23,871.10 पर्यंत खाली आला. नंतर सुधारणा होत तो 23,943.90 अंकांवर व्यवहार करत होता.

सेक्टोरल कामगिरी पाहता, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टीसीएस आणि ट्रेंट लिमिटेड यांसारख्या आयटी आणि काही मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 1.77 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. दुसरीकडे, ओएनजीसी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारती एअरटेल, मॅक्स हेल्थकेअर आणि एसबीआय लाईफ इन्शुरन्स यांसारख्या शेअर्समध्ये 1 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली.

आजच्या व्यवहारात 2,817 शेअर्स सक्रिय राहिले, ज्यामध्ये 1,478 शेअर्स वाढले तर 1,339 शेअर्स घसरले. सेन्सेक्समधील 30 पैकी 17 शेअर्स तेजीत होते, तर 13 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. निफ्टीमधील 50 पैकी 24 शेअर्स वाढले, तर 26 शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली.

एकूणच, बाजारात सततच्या खरेदी-विक्रीच्या झोकांमध्ये अस्थिरता कायम राहिली, मात्र आयटी क्षेत्रातील मजबूत खरेदीमुळे निर्देशांकांना आधार मिळाल्याचे चित्र दिसले.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande