
छत्रपती संभाजीनगर, 29 मे (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोनाराला चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या तीन आरोपींना जेरबंद केले आहे. अंभई घाट परिसरात पालोद येथील सराफ व्यावसायिक नितीन निकम यांना अडवून आरोपींनी सोने, चांदी व रोख रक्कम लुटून पळ काढला होता. या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळावरील सीसीटीव्ही, संशयितांची चौकशी व गोपनीय माहितीच्या आधारे दत्ता राऊत याला बिडकीन येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने रोशन ऊर्फ सोनू सुरडकर आणि लखन सूर्यवंशी यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही पकडले. यावेळी रोशन सुरडकर याच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला.
आरोपींकडून सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल व गावठी पिस्टल असा सुमारे ६ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis