रत्नागिरी : हॉटेल रजिस्टर चोरी प्रकरणी कर्नाटकातून एकाला अटक
रत्नागिरी, 29 मे (हिं.स.) । राजापूर आणि संगमेश्वर येथील हॉटेलमधील ग्राहक नोंदणी रजिस्टर चोरी प्रकरणातील चार संशयित आरोपींच्या शोधासाठी कर्नाटकात गेलेल्या राजापूर व संगमेश्वर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील अर्शद अहमद निसार अहमद पोकाकी (
रत्नागिरी : हॉटेल रजिस्टर चोरी प्रकरणी कर्नाटकातून एकाला अटक


रत्नागिरी, 29 मे (हिं.स.) । राजापूर आणि संगमेश्वर येथील हॉटेलमधील ग्राहक नोंदणी रजिस्टर चोरी प्रकरणातील चार संशयित आरोपींच्या शोधासाठी कर्नाटकात गेलेल्या राजापूर व संगमेश्वर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील अर्शद अहमद निसार अहमद पोकाकी (वय २५, रा. मुंडगोड, जि. उत्तर कन्नड, कर्नाटक) याला पोलिसांनी कर्नाटकातील हरपन्नहळ्ळी येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे.

महाराष्ट्रासह विविध राज्यांतील हॉटेल व लॉजिंगमधील ग्राहक नोंदणी रजिस्टर चोरी करून ती दुसऱ्या टोळीला विकण्याचे काम ही टोळी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या रजिस्टरमधील ग्राहकांचे मोबाइल क्रमांक वापरून त्यांना ब्लॅकमेल करणे, आर्थिक फसवणूक करणे व खंडणी उकळण्याचे प्रकार कर्नाटकातील दुसरी टोळी करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

अटक केलेल्या आरोपीला राजापूर न्यायालयात न्यायालयात हजर केले असता त्याची ११ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, संगमेश्वर पोलिसांनीही या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

गेल्या १८ मे रोजी राजापूर येथील हॉटेल फुडलॅन्ड तसेच संगमेश्वर येथील हॉटेल श्रद्धा येथून लॉजिंगचे नोंदणी रजिस्टर घेऊन चार संशयित आरोपी पसार झाले होते. पलायन करताना त्यांनी महामार्गावरील तुरळ येथे गाडी सोडून पळ काढला होता. पोलिसांना त्या गाडीत सात मोबाइल फोन आणि नऊ हॉटेल व लॉजिंगची नोंदणी रजिस्टर आढळून आली होती.

तपासादरम्यान सर्व आरोपी कर्नाटकातील असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या आदेशानुसार व राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोबीन शेख, पोलीस कर्मचारी प्रथमेश उकार्डे व श्री. लोखंडे यांच्या विशेष पथकाने कर्नाटकात जाऊन शोधमोहीम राबवली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने २६ मे रोजी रात्री अर्शद पोकाकी याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

पोलिस तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, ही टोळी महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेशसह विविध राज्यांतील हॉटेल व लॉजिंगमधील नोंदणी रजिस्टर चोरी करत होती. त्यानंतर त्या रजिस्टरमधील ग्राहकांच्या संपर्क क्रमांकावर फोन करून “आपण अमुक हॉटेलमध्ये भेटलो होतो”, “एकत्र चहा घेतला होता” अशी खोटी ओळख निर्माण केली जात होती. त्यानंतर कमी दरात सोने उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून संबंधितांना जाळ्यात ओढले जात होते आणि बनावट व्यवहारातून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात होती.

कर्नाटकातील काही विशिष्ट गावांमधून अशा प्रकारची टोळी कार्यरत असल्याची माहितीही पोलिस तपासातून पुढे आली आहे. या प्रकरणातील उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू असून, कर्नाटक पोलिसांच्या सहकार्याने संपूर्ण टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास राजापूर पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande