
रत्नागिरी, 29 मे (हिं.स.) । सोशल मीडियावर शेअर केलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत राजापूर तालुक्यातील वडदहसोळ येथील एका ३१ वर्षीय डॉक्टरला धमकी देऊन २ लाख २५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी साटवली (ता. लांजा) येथील येथील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉक्टरांचा २०२५ मधील सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून एका महिलेशी संपर्क आला होता. त्यानंतर संबंधित महिलेच्या सांगण्यावरून त्यांनी स्वतःचे काही नग्न फोटो तिच्यासोबत शेअर केले होते.
दरम्यान, २२ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आरोपीने या जुन्या फोटोंचा गैरवापर करून डॉक्टरला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आरोपी सिद्धेश जयवंत आंबरे (वय ३०, रा. साटवली, ता. लांजा) याने आपल्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून फिर्यादी डॉक्टरच्या व्हॉट्सअॅपवर संबंधित फोटो पाठवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
हे फोटो सोशल मीडियावरून हटवण्यासाठी आणि इतरांना न दाखवण्यासाठी आरोपीने डॉक्टरकडे एकूण २ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली. धमकीमुळे घाबरलेल्या डॉक्टरने गुगल पेद्वारे आरोपीच्या खात्यावर २५ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्स्फर केल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.
आरोपीकडून पैशांची मागणी सुरूच राहिल्याने आणि मानसिक त्रास वाढत असल्याने अखेर संबंधित डॉक्टरने २७ मे २०२६ रोजी रात्री राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून राजापूर पोलिसांनी आरोपी सिद्धेश जयवंत आंबरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी