
लातूर, 03 मे (हिं.स.)।
शिवपूर (ता. शिरूर अनंतपाळ) येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालयात आयोजित स्पर्धा परीक्षा संदर्भ ग्रंथ प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “ग्रंथांना जात, धर्म, पंथ नसतो. ग्रंथवाचनामुळे वैचारिक प्रगल्भता येते आणि माणूस समृद्ध होतो. त्यामुळे उद्याच्या पिढीत वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर अनंतपाळ पंचायत समितीचे सभापती तथा ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष ग्रंथमित्र संजय सूर्यवंशी हे होते. यावेळी ललिता सबनीस व जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे प्रदेश महासचिव बालाजी जाधव उजेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
डॉ. सबनीस यांनी पुढे सांगितले की, ग्रंथालय चळवळीला शासन स्तरावर अधिक बळ मिळणे आवश्यक असून, ग्रामीण भागातील ग्रंथालयांच्या विकासासाठी आपण निश्चित प्रयत्न करू.
डॉ. सबनीस यांनी ग्रंथालयाची सुसज्ज इमारत, समृद्ध ग्रंथसंपदा, नाविन्यपूर्ण बालवाचक कक्ष आणि “बोलक्या भिंती” यांचे अवलोकन करून समाधान व्यक्त केले व ग्रामीण वाचन संस्कृती वाढविणाऱ्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले.
प्रास्ताविकात संजय सूर्यवंशी यांनी ग्रंथालयाची वाटचाल व तालुक्यातील ग्रंथालय चळवळीची माहिती दिली. बालाजी जाधव यांनी डॉ. सबनीस यांचा परिचय करून दिला. यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस व ललिता सबनीस यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा संदर्भ ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis