
रत्नागिरी, 03 मे (हिं.स.) । रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय महाराष्ट्रातील सर्वात जुने वाचनालय १ लाख १६ हजारांच्या ग्रंथसंपदेचे वैभव बाळगून आहे. आता ती ग्रंथसंपदा दोन लाख करण्याचा संकल्प सोडण्यात आल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
जिल्हा नगर वाचनालयात अनेक दुर्मिळ ग्रंथ आहेत. ते वाचकांची वाचन तृष्णा भागवण्याचे काम करत आहेत. विविध विषय, विविध साहित्य प्रकार यांना सामावून जुन्या साहित्याचे माहेरघर म्हणून रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाकडे पाहिले जाते.
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाची नवी सुसज्ज वास्तू साकारण्याचे काम सुरू असतानाच ग्रंथसंपदा आणि वाचकवर्ग वाढीसाठी प्रयत्न करण्याचा संकल्प वाचन संस्कृतीला अधिक सजग करण्यासाठी करण्यात आला आहे.
वाचनालयाची ग्रंथसंपदा २ लाख करण्याचा संकल्प करून नवीन वर्षाच्या प्रारंभी हा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. हा संकल्प इतक्या कमी कालावधीत पूर्ण करण्यासाठी जागृत वाचक चळवळीला सक्रिय करावे लागणार आहे. ग्रंथप्रेमी व्यक्ती, विविध अस्थापना, लोकप्रतिनिधी या प्रत्येकाचे सहकार्य आवश्यक आहे. रत्नागिरीतील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी, शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने, रत्नागिरीतील सर्व शिक्षकांनी, प्रतिथयश डॉक्टर्स, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, रत्नागिरीच्या भौगोलिक सौंदर्यात भर घालणारे बिल्डर्स, रत्नागिरीतील नेकीने व्यवसाय करणारे व्यापारी, विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक काम करणाऱ्या संस्था, आस्थापना, रत्नागिरीतील बँकिंग जगत या प्रत्येक क्षेत्राने आपापल्या वाढदिवशी, वर्धापनदिनी किमान नवी पाच व कमाल कितीही पुस्तके रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाला प्रदान करावी. ही पुस्तक भेटीची चळवळ सर्वदूर पसरली तर २ लाख ग्रंथसंग्रहाचे उद्दिष्ट सहज पूर्ण होईल, अशी अपेक्षा अध्यक्षांनी व्यक्त केली.
चालू आर्थिक वर्षात ग्रंथ खरेदीसाठी अतिरिक्त निधी उभारून गतवर्षीपेक्षा दुप्पट खर्च नव्या पुस्तक खरेदीसाठी करण्यात येईल. रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालय २ लाख ग्रंथ असणारे कोकणातील पहिले वाचनालय ठरावे. तसेच वाचक संख्याही वाढून ३ हजार व्हावी, असा प्रयत्न जाणीवपूर्वक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वांना वाचनालयाकडे नवीन तसेच आपल्याकडील सुस्थितीतील मराठी, इंग्रजी, संस्कृत पुस्तके वाचनालयाला भेट म्हणून द्यावीत अगर पुस्तक खरेदीसाठी आर्थिक मदत करावी असेही आवाहन ॲड. पटवर्धन यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी