
नवी दिल्ली, 03 मे (हिं.स.)राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पंजाब सरकारच्या यंत्रणेच्या कथित गैरवापराची माहिती देण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. राघव चड्ढा यांचा दावा आहे की, पंजाब सरकारच्या यंत्रणेचा वापर राजकीय सूडबुद्धीसाठी आणि अलीकडेच आम आदमी पार्टी (आप) सोडून भारतीय जनता पार्टी (भाजप) मध्ये सामील झालेल्या खासदारांना लक्ष्य करण्यासाठी केला जात आहे. राष्ट्रपतींनी खासदार राघव चड्ढा आणि इतर तीन खासदारांना ५ मे रोजी सकाळी १०:४० वाजता भेटीची वेळ दिली असल्याची माहिती आहे.
राघव चड्ढा हे अरविंद केजरीवाल यांच्या खूप जवळचे मानले जात होते. आंदोलनापासून हे दोघे एकत्र होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात आम आदमी पार्टीमधून केली. २०१५ मध्ये त्यांची पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक दक्षिण दिल्लीतून लढवली, पण त्यात त्यांचा पराभव झाला. २०२० मध्ये त्यांनी राजेंद्र नगरमधून दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर त्यांची आम आदमी पार्टीचे पंजाब प्रभारी म्हणून नियुक्ती झाली. २१ मार्च २०२२ रोजी, आम आदमी पार्टीने त्यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले. राघव चड्ढा हे पंजाबमधील सर्वात तरुण राज्यसभा सदस्य आहेत. ते पूर्वी दिल्ली जल बोर्डाचे उपाध्यक्ष होते आणि २०२२ पर्यंत दिल्लीतील राजेंद्र नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे