
- तपास सीआयडीकडे वर्ग
पुणे, 30 मे (हिं.स.)।
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणात मृतांचा आकडा १८ वर पोहोचला आहे. फुगेवाडी-दापोडी परिसरातील १२ आणि हडपसरमधील ६ नागरिकांचा गेल्या दोन दिवसांत मृत्यू झाला असून अनेक जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. फुगेवाडीतील सहा रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे.
या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अधिक नफा कमावण्याच्या उद्देशाने आरोपी योगेश वानखेडे हा दारूमध्ये मिथेनॉल हे अत्यंत घातक रसायन मिसळत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. अवैध दारू विक्री आणि तस्करीशी संबंधित गुन्ह्यांमध्ये आधीपासूनच त्याचे नाव असून, या प्रकरणातील पहिली अटकही त्यालाच करण्यात आली होती.
तपासानुसार, उरळी कांचन येथील देशी दारू भट्टी चालक राधेश्याम प्रजापती याच्याकडून वानखेडे ३५ लिटरचा दारूचा कॅन १,९०० रुपयांना खरेदी करत होता. ही दारू पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध अवैध विक्री केंद्रांवर २,७०० रुपयांना विकली जात होती. मात्र, दारूचे प्रमाण वाढवून अधिक नफा मिळवण्यासाठी ऑनलाईन मागवलेले मिथेनॉल त्यात मिसळले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याच विषारी मिश्रणामुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निष्काळजीपणाबाबत कठोर भूमिका घेत हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले, एपीआय सिकलगर आणि पोलीस उपनिरीक्षक मुलानी यांना निलंबित केले आहे.
या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी चार जणांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास यंत्रणा विषारी दारूच्या संपूर्ण पुरवठा साखळीचा शोध घेत असून आणखी काही आरोपींचा सहभाग उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु