सीयूईटी-यूजी परीक्षेतील गोंधळावरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका
नवी दिल्ली, 30 मे (हिं.स.)। देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट-अंडरग्रॅज्युएट (सीयूईटी-यूजी २०२६) परीक्षेदरम्यान झालेल्या तांत्रिक गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले. अनेक केंद्रांवर
Rahul Gandhi


नवी दिल्ली, 30 मे (हिं.स.)। देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट-अंडरग्रॅज्युएट (सीयूईटी-यूजी २०२६) परीक्षेदरम्यान झालेल्या तांत्रिक गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले. अनेक केंद्रांवर परीक्षा वेळेत सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. या प्रकारामुळे देशातील परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आयोजनातील अव्यवस्थेवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर म्हटले की, “नीट, सीबीएसई, एसएससी आणि आता सीयूईटी – चार परीक्षा, एक कोटी विद्यार्थी; मात्र एकही परीक्षा सुरळीतपणे पार पडलेली नाही.” त्यांनी आरोप केला की, सरकार स्वतःला सर्वोत्तम असल्याचा दावा करते, पण देशात एक परीक्षाही व्यवस्थित आयोजित करू शकत नाही आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. राहुल गांधी यांनी पुढे म्हटले की, ज्या पिढीचे भविष्य अंधारात ढकलले जात आहे, तीच पिढी भविष्यात या कारभाराचा हिशोब मागेल,” असेही ते म्हटले.

दरम्यान, सीयूईटी-यूजी २०२६ परीक्षेदरम्यान अनेक महत्त्वाच्या केंद्रांवर अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली. शनिवारी सकाळच्या सत्रातील परीक्षा तब्बल सव्वादोन तास उशिराने सुरू झाली, कारण ऑनलाइन प्रश्नपत्रिका अपलोड होऊ शकल्या नव्हत्या. जयपूरसह देशभरातील अनेक परीक्षा केंद्रांवर ही समस्या उद्भवली. केंद्रांवर स्पष्ट माहिती मिळत नसल्याने विद्यार्थी आणि पालक संभ्रमात होते. अनेक ठिकाणी पालकांनी नाराजीही व्यक्त केली. यापूर्वी नीट, सीबीएसई, एसएससी परीक्षांबाबत विविध वाद निर्माण झाले होते. त्यानंतर आता देशातील सर्वात मोठ्या प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या सीयूईटीमध्येही गोंधळ झाल्याने परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

वाद वाढत असताना परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीएने) स्पष्टीकरण देताना सांगितले की, परीक्षा संचालनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या संस्थेच्या तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या निर्माण झाली. सर्व्हरमध्ये अडचण आल्याने प्रश्नपत्रिका वेळेत अपलोड होऊ शकल्या नाहीत. सकाळी ९ वाजता सुरू होणारी परीक्षा दुपारी ११ वाजून २३ मिनिटांपर्यंत सुरू होऊ शकली नव्हती. दरम्यान, एनटीएने विद्यार्थी आणि पालकांची माफी मागितली आहे. काही केंद्रांवर तांत्रिक अडचणी आल्या होत्या, मात्र त्या वेळेत दूर करण्यात आल्याचा दावा संस्थेने केला आहे. सकाळच्या सत्रातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा पूर्ण परीक्षाकाल देण्यात आला असून कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नसल्याचेही संस्थेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान,एनटीएने या गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालकांना झालेल्या त्रासाबद्दल जाहीर खेद व्यक्त केला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी 91-11-40759000 हा हेल्पलाईन क्रमांक आणि cuet-ug@nta.ac.in हा ईमेल आयडी जाहीर केला आहे.

यंदाची सीयूईटी-यूजी परीक्षा ११ मेपासून सुरू झाली असून ३१ मे २०२६ पर्यंत देशभरातील विविध केंद्रांवर आणि वेगवेगळ्या सत्रांमध्ये आयोजित करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी होत असल्याने आणि विषयांच्या विविध संयोजनांमुळे परीक्षा अनेक दिवसांमध्ये घेतली जाते. मात्र अंतिम टप्प्यात निर्माण झालेल्या या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचा तणाव वाढला असून परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande