
मुंबई, 30 मे (हिं.स.)। मुंबई आणि महानगर प्रदेशातील नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा फटका बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडने दाबित नैसर्गिक वायूच्या (सीएनजी) दरात प्रतिकिलो २ रुपयांची वाढ केली असून, त्यामुळे हा दर आता ८६ रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर पाईपद्वारे पुरवला जाणारा स्वयंपाकासाठीचा नैसर्गिक वायूही (पीएनजी) ५० पैशांनी महागला असून, त्याचा दर प्रति युनिट ५२ रुपयांपर्यंत वाढला आहे. ही दरवाढ आजपासून, म्हणजेच ३० मेपासून लागू झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर याचा थेट परिणाम होणार आहे.
दाबित नैसर्गिक वायूवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या रिक्षा, टॅक्सी, बस आणि खासगी वाहनचालकांचे आर्थिक गणित या दरवाढीमुळे कोलमडण्याची शक्यता आहे. वाहतूक खर्च वाढल्याने त्याचा परिणाम शेवटी सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर होणार आहे. पाईपद्वारे मिळणाऱ्या स्वयंपाकाच्या वायूच्या दरवाढीचा फटका मात्र थेट महानगर प्रदेशातील ३१ लाखांहून अधिक घरांवर बसणार आहे.
वाहतूक संघटनांनी या पार्श्वभूमीवर भाडेवाढीची मागणी पुन्हा पुढे केली आहे. मुंबई रिक्षा युनियनचे नेते थम्पी कुरियन यांनी सांगितले की, वाढत्या इंधनदरांच्या आधारे भाडेवाढीच्या सूत्राची नव्याने मोजणी करावी लागेल. त्यांच्या म्हणण्यानुसार, मूळ भाड्यात प्रति किलोमीटर अंदाजे १.१२ रुपयांची वाढ आवश्यक ठरते. त्यामुळे साधारणपणे एक रुपयांची भाडेवाढ करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. ही मागणी परिवहन विभागाकडे पाठवली जाणार असून, अंतिम निर्णय महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण घेणार आहे. टॅक्सी संघटनांनीही किमान २ ते ३ रुपयांची भाडेवाढ करण्याची मागणी केली आहे.
महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी या वाढीमागे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीतील अडचणी, महागड्या वायू स्रोतांवरील वाढते अवलंबित्व, कच्च्या तेलाच्या चढ्या किमती आणि रुपयाचे अवमूल्यन ही प्रमुख कारणे असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, १३ मे रोजी झालेल्या दरवाढीनंतर या महिन्यातील ही दुसरी वाढ ठरली आहे. एप्रिल महिन्यातही प्रतिकिलो १ रुपयांची वाढ करण्यात आली होती.
दरवाढ झाली असली तरी, दाबित नैसर्गिक वायू पेट्रोलच्या तुलनेत सुमारे ४५ टक्के आणि डिझेलच्या तुलनेत १२ टक्के बचत देत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. मुंबई परिसरात दाबित नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या वाहनांची संख्या गेल्या वर्षभरात जवळपास दोन लाखांनी वाढून १२ लाखांच्या पुढे गेली आहे. यामध्ये सुमारे ४.७ लाख रिक्षा, १.६ लाखांहून अधिक टॅक्सी आणि पाच लाखांहून अधिक खासगी वाहनांचा समावेश आहे. तसेच बेस्ट, ठाणे महानगर परिवहन, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, नवी मुंबई महानगर परिवहन आणि खासगी बस-टेम्पो मिळून हजारो वाहनांना याच इंधनाचा आधार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule