फुगेवाडी विषारी दारू प्रकरणात मृतांचा आकडा १8 वर, सहा कर्मचारी निलंबित
पुणे, 30 मे (हिं.स.)। पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी येथे घडलेल्या विषारी दारू दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघ
grdf


पुणे, 30 मे (हिं.स.)।

पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी येथे घडलेल्या विषारी दारू दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, फौजदार राजू भास्कर तसेच जयदीप सोनवणे, नवनाथ पोटे, सागर जाधव आणि विशाल काळे या कर्मचाऱ्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले असून विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत ही कारवाई कायम राहणार आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपींनी स्पिरिटसह इतर रसायनांचा वापर करून बनावट दारू तयार केल्याचे उघड झाले आहे. ही दारू ३५ लिटर क्षमतेच्या १२ ड्रममध्ये साठवून ठेवण्यात आली होती. त्यापैकी एक ड्रम फुगेवाडी येथील कर्नेलसिंग आणि गुरमंगतसिंग यांच्याकडे विक्रीसाठी पाठविण्यात आला होता. स्थानिक ग्राहकांना ही दारू विकल्यानंतर बुधवारी सायंकाळी अनेकांनी तिचे सेवन केले.

दारू प्राशन केल्यानंतर संबंधितांना चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अंधारी येणे आणि अस्वस्थता अशी गंभीर लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर त्यांना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना १८ जणांचा मृत्यू झाला. तर पाच जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून बेकायदा दारू निर्मिती आणि विक्री रोखण्यात झालेल्या त्रुटींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande