
कोल्हापूर, 30 मे (हिं.स.)। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आजपासून अंतरवाली सराटी येथे सुरु आमरण उपोषण केले आहे. दरम्यान त्या आंदोलनाला कोल्हापूर संस्थानचे छत्रपती खा. शाहू महाराज यांनी जाहीर पाठींबा देतानाच मनोज जरांगे यांनी हैद्राबाद, सातारा, कोल्हापूर, औंध, सांगली मिरज संस्थानच्या गॅझेटच्या धर्तीवर मराठा आरक्षण द्यावे अशी मागणी केली होती. पण आता फक्त हैद्राबाद गॅझेटचाच उल्लेख आला. त्याबाबत मात्र खा. शाहू महाराज यांनी नाराजी व्यक्त केली. कोल्हापूरपेक्षा त्यांना हैद्राबाद जवळचे वाटते का? असा प्रश्न उपस्थित करतानाच खा. शाहू महाराज यांनी सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात नेमके काय ठरतयं हेच कळत नाही असे म्हणत आंदोलनावरच प्रश्न उपस्थित केला आहे.
अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी कोल्हापुरातील दसरा चौकात सकल मराठा समाजाने राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले. यावेळी खा. शाहू महाराज यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना गेली 8 वर्षे मराठा समाज आंदोलन करीत आहे. पण सरकारकडून वाटाघाटी होतात पण अंमलात काहीच येत नाही. निर्णयही होत नाही. मराठा समाजाची फसवणूक झाली आहे. मराठ्यानां अद्याप काहीच मिळालेले नाही. अशी परिस्थिती आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आमचा कायम पाठींबाच राहील. पण ते ज्या भागात रहातात तो भाग पूर्वी हैद्राबाद संस्थानात होता. त्यामुळे त्यांना हैद्राबाद जवळचे आणि कोल्हापूर लांबचे वाटत असावे अशी पुष्टी जोडतानाच कोल्हापूरातील सकल मराठा समाजाच्या सर्व नेत्यांनी मराठा आरक्षण देताना कोल्हापूर गॅझेट लागू करावे अशी मागणी केली. राजर्षी शाहू महाराजांनी देशात प्रथम १९०२ साली करवीर म्हणजेच कोल्हापूर संस्थानात आरक्षण लागू केले. त्यामध्ये मराठा समाजालाही आरक्षण दिले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar