मे महिन्यात एफपीआयने भारतीय शेअर बाजारातून ३३,००० कोटी रुपयांची विक्री
नवी दिल्ली, 31 मे (हिं.स.)। भारतीय शेअर बाजाराकडे पाठ फिरवत परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) मे महिन्यात तब्बल ३२,९६३ कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली आहे. कंपन्यांचे अपेक्षेपेक्षा कमकुवत तिमाही निकाल, रुपयाचे सातत्याने होत असलेले अवमूल्यन
Stock Market FPI Selling


नवी दिल्ली, 31 मे (हिं.स.)। भारतीय शेअर बाजाराकडे पाठ फिरवत परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) मे महिन्यात तब्बल ३२,९६३ कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली आहे. कंपन्यांचे अपेक्षेपेक्षा कमकुवत तिमाही निकाल, रुपयाचे सातत्याने होत असलेले अवमूल्यन आणि इतर जागतिक बाजारपेठांमधील अधिक आकर्षक परतावा यामुळे परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातील गुंतवणूक कमी केल्याचे दिसून आले आहे.

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या आकडेवारीनुसार, २०२६ या वर्षात आतापर्यंत परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून एकूण २.२५ लाख कोटी रुपयांची रक्कम काढून घेतली आहे. विशेष म्हणजे ही रक्कम संपूर्ण २०२५ वर्षात झालेल्या १.६६ लाख कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीपेक्षाही जास्त आहे. यावरून भारतीय बाजाराबाबत परकीय गुंतवणूकदारांचा सावध दृष्टिकोन स्पष्ट होत आहे.

यंदा फेब्रुवारी महिना वगळता इतर सर्व महिन्यांत परकीय गुंतवणूकदार निव्वळ विक्रेते राहिले आहेत. जानेवारीमध्ये त्यांनी ३५,९६२ कोटी रुपयांची विक्री केली होती. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये २२,६१५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती, जी मागील १७ महिन्यांतील सर्वात मोठी मासिक गुंतवणूक ठरली होती. मात्र त्यानंतर परिस्थिती पुन्हा बदलली. मार्च महिन्यात विक्रीचा विक्रम नोंदवत तब्बल १.१७ लाख कोटी रुपयांची माघार घेण्यात आली. एप्रिलमध्ये ६०,८४७ कोटी रुपये आणि मेमध्ये सुमारे ३३ हजार कोटी रुपयांची विक्री झाली.

बाजारतज्ज्ञांच्या मते, भारतीय कंपन्यांचे तिमाही आर्थिक निकाल अपेक्षेपेक्षा कमकुवत राहिल्यामुळे परकीय गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला आहे. जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक धोरणतज्ज्ञ व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले की, अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया आणि तैवानमधील कंपन्यांची कामगिरी भारताच्या तुलनेत अधिक मजबूत राहिली आहे. तसेच एआई आधारित तंत्रज्ञान क्षेत्रातील तेजीमुळे दक्षिण कोरिया आणि तैवानच्या बाजारपेठा परकीय गुंतवणूकदारांना अधिक आकर्षित करत आहेत.

सेंट्रिसिटी वेल्थटेकचे समभाग विभाग प्रमुख आणि संस्थापक भागीदार सचिन जसूजा यांच्या मते, रुपयातील सातत्यपूर्ण घसरण हेही निधी बाहेर जाण्याचे महत्त्वाचे कारण आहे. २०२६ मध्ये आतापर्यंत रुपयाचे मूल्य सुमारे सहा टक्क्यांनी घटले असून गेल्या एका वर्षात जवळपास दहा टक्के अवमूल्यन झाले आहे. याशिवाय भारताची कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्वही चिंतेचा विषय ठरत आहे. देश आपल्या गरजेपैकी ८० टक्क्यांहून अधिक कच्चे तेल आयात करतो. होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील अडथळ्यांमुळे ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ७० डॉलर्सवरून ९५ ते १०५ डॉलर्सपर्यंत वाढली आहे. त्यामुळे आयात खर्च आणि चालू खात्यातील तूट वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तथापि, मे महिन्यातील विक्रीचा वेग मागील काही महिन्यांच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून आले आहे. मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडियाचे संशोधन प्रमुख हिमांशू श्रीवास्तव यांनी सांगितले की, यामुळे परकीय गुंतवणूकदार भारतातील गुंतवणूक कमी करण्याबाबत पूर्वीइतके आक्रमक राहिलेले नाहीत, असा संकेत मिळतो. मात्र व्यापक आर्थिक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होत नाही तोपर्यंत परकीय गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात पुनर्गुंतवणूक होण्याची शक्यता सध्या कमी असल्याचे मत सचिन जसूजा यांनी व्यक्त केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande