मुंबईसह राज्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज
अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट मुंबई, 31 मे (हिं.स.)। राज्यात सध्या मान्सूनपूर्व पावसाची जोरदार चाहूल लागली असून मुंबईसह अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने उष्णता आणि उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुस
Pre Monsoon Showers Arrive Across State


अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई, 31 मे (हिं.स.)। राज्यात सध्या मान्सूनपूर्व पावसाची जोरदार चाहूल लागली असून मुंबईसह अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने उष्णता आणि उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये रविवारपासून सलग तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय पालघर आणि ठाणे जिल्ह्यांसाठी सोमवारी मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकण पट्ट्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही सोमवार आणि मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली असून या जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये रविवारी पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली. मुंबईतील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, विलेपार्ले आणि सांताक्रूझ परिसरात पहाटे पाच वाजल्यापासून पावसाच्या सरी कोसळू लागल्या. तसेच माटुंगा, सायन आणि कुर्ला परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दादर परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे रस्ते ओलसर झाले होते. तर नवी मुंबईतील जुईनगर, वाशी आणि सानपाडा परिसरातही पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. तसेच ठाणे शहरातही पावसाने हजेरी लावली. मात्र पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गोंदियात मान्सूनपूर्व पावसाचा फटका; धान-मका भिजून लाखोंचे नुकसान

गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यालगत वाळवण्यासाठी ठेवलेले धान आणि मका भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडे पंचनामा करून तातडीने भरपाई देण्याची मागणी केली आहे.

जळगावात वादळासह मुसळधार पाऊस; वीज पुरवठा विस्कळीत

जळगाव शहर आणि जिल्ह्यात पहाटे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. सुमारे अर्धा तास वारे आणि १५ ते २० मिनिटे जोरदार पाऊस पडल्याने अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाला. मात्र, या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

दुसरीकडे विदर्भातही तापमानाचा पारा चांगलाच वाढल्यानंतर आता पावसाने दिलासा दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सुमारे एक तास सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

भंडारा जिल्ह्यातही शनिवारी सायंकाळी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिक, पाळीव जनावरे आणि पक्षीही उकाड्यामुळे त्रस्त झाले होते. मात्र या पावसानंतर भंडारा शहरासह ग्रामीण भागात वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande