ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन
मुंबई, 31 मे (हिं.स.) : ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन झाले आहे. आज (31 मे) रोजी मुंबईतील राहत्या घरी सुमनताईंनी अखेरचा श्वास घेतला. त्या 89 वर्षांच्या होत्या. आपल्या मधाळ आणि दैवी सुरांनी गेली अनेक दशकं श्रोत्यांच्या मनावर राज्य केले होत
गायिका सुमन कल्याणपूर


मुंबई, 31 मे (हिं.स.) : ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन झाले आहे. आज (31 मे) रोजी मुंबईतील राहत्या घरी सुमनताईंनी अखेरचा श्वास घेतला. त्या 89 वर्षांच्या होत्या. आपल्या मधाळ आणि दैवी सुरांनी गेली अनेक दशकं श्रोत्यांच्या मनावर राज्य केले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण लाखो संगीतप्रेमींवर शोककळा पसरली आहे.

सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी बांगलादेशातील (तत्कालीन अविभाजित भारत) भवानीपूर येथे झाला होता. लहानपणापासूनच त्यांना संगीताची प्रचंड आवड होती. त्यांनी संगीताचा अतिशय कसून आणि सखोल अभ्यास केला होता. सुमनजींचे माहेरचे आडनाव 'हेमाडी' असे होते. त्यामुळे लग्नापूर्वी त्या सिनेसृष्टीत 'सुमन हेमाडी' या नावानेच गाणी गात असत आणि याच नावाने त्यांची सुरुवातीची गाणी लोकप्रिय झाली.

मराठी संगीतसृष्टीत त्यांचे पदार्पण महान कवी ग. दि. माडगुळकर (गदिमा) यांच्या गीताने झाले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 'निंबोणीच्या झाडामागे', 'अरे संसार संसार', 'केतकीच्या बनी तिथे नाचला मोर' आणि 'रिमझिम झरती श्रावणधारा' यांसारखी एकापेक्षा एक अजरामर भावगीते आणि भक्तीगीते त्यांनी गायिली. आजही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात ही गाणी आवर्जून ऐकली जातात. सुमनताईंनी केवळ मराठीच नाही, तर हिंदी, गुजराती आणि बंगाली भाषांमध्येही हजारो गाणी गायली. त्यांच्या याच अथांग संगीत सेवेची दखल घेत भारत सरकारने २०२३ मध्ये त्यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित केले होते. गेल्या काही काळापासून त्या वाढत्या वयामुळे कलाविश्वापासून दूर होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande