फिप्रेस्को - इंडिया ग्रँड प्रिक्स २०२६ च्या सर्वोत्तम १० चित्रपटांमध्ये ‘गोंधळ’ची निवड
मुंबई, 02 जून, (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक संघटना फिप्रेस्को (दि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स)च्या भारतीय शाखेने, ‘फिप्रेस्को - इंडिया ग्रँड प्रिक्स’ या प्रतिष्ठित पुरस्काराद्वारे उत्कृष्ट चित्रपट कलेचा गौरव करण्याची आपली परंपरा
फिप्रेस्को - इंडिया ग्रँड प्रिक्स २०२६’ च्या सर्वोत्तम १० चित्रपटांमध्ये ‘गोंधळ’ची निवड


मुंबई, 02 जून, (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक संघटना फिप्रेस्को (दि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स)च्या भारतीय शाखेने, ‘फिप्रेस्को - इंडिया ग्रँड प्रिक्स’ या प्रतिष्ठित पुरस्काराद्वारे उत्कृष्ट चित्रपट कलेचा गौरव करण्याची आपली परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. गोव्यातील भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) दरम्यान दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. भारतात या पुरस्काराच्या स्थापनेपासून त्याला कस्टर्ड ॲपल पिक्चर्स यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. हा पुरस्कार भारतातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या समीक्षक आधारित सन्मानांपैकी एक मानला जातो. कलात्मक उत्कृष्टता, मौलिकता आणि समकालीन समाजाशी अर्थपूर्ण संवाद साधणाऱ्या चित्रपट निर्मात्यांचा यामार्फत गौरव केला जातो. निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोर असून ती पूर्णपणे चित्रपट समीक्षकांच्या मतदानावर आधारित असते. यावर्षीच्या सर्वोत्तम १० चित्रपटांच्या यादीत ‘गोंधळ’सोबतच मराठी चित्रपट ‘साबर बोंडं’ तसेच गेल्या वर्षी भारताची ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशिका ठरलेला ‘होमबाउंड’ या चित्रपटांचाही समावेश आहे. त्यामुळे या निवडीकडे भारतीय चित्रपटसृष्टीत विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.

यावर्षी ‘फिप्रेस्को - इंडिया’च्या ३० सदस्यांनी भारतातील विविध भाषा आणि प्रदेशांतील १५० हून अधिक फिचर फिल्म्स पाहून त्यांचे मूल्यमापन केले. पहिल्या फेरीत ६० चित्रपटांची निवड करण्यात आली आणि त्यानंतर सदस्यांनी मतदान करून वर्षातील सर्वोत्तम १० भारतीय चित्रपट निश्चित केले. या मानाच्या यादीत ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाचा समावेश झाला आहे. नवोदित दिग्दर्शक संतोष डावखर यांनी दिग्दर्शित केलेला आणि दीक्षा डावखर यांनी डावखर फिल्म्स या बॅनरखाली निर्मित केलेला हा चित्रपट आहे. यापूर्वी ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) या चित्रपटासाठी संतोष डावखर यांना सिल्व्हर पिकॉक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार प्राप्त झाला होता. आता ‘फिप्रेस्को - इंडिया’च्या सर्वोत्तम १० चित्रपटांमध्ये झालेल्या निवडीमुळे या चित्रपटाच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

प्रदर्शनानंतर ‘गोंधळ’ या चित्रपटाने राष्ट्रीय स्तरावर समीक्षक, प्रेक्षक आणि चित्रपट महोत्सवांकडून मोठी दाद मिळवली आहे. १७व्या बेंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ मध्ये चित्रपटाला प्रतिष्ठेचा फिप्रेस्को पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ्फ) २०२६ मध्ये दिग्दर्शक संतोष डावखर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार तर चित्रपटाला सर्वोत्कृष्ट छायाचित्रण पुरस्कार मिळाला. तसेच २२व्या थर्ड आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ मध्येही संतोष डावखर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराने गौरवण्यात आले. चित्रपटाच्या प्रभावी दृश्यभाषा आणि उत्कृष्ट छायाचित्रणाची दखल घेत मटा सन्मान पुरस्कार २०२६ तसेच झी चित्र गौरव पुरस्कार २०२६ मध्ये ‘गोंधळ’ला सर्वोत्कृष्ट छायाचित्रण पुरस्कार प्राप्त झाला. या मानाच्या पुरस्कारांमुळे ‘गोंधळ’ हा २०२६ मधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या आणि गौरवप्राप्त मराठी चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

विशेष म्हणजे, ‘गोंधळ’ तब्बल सात भाषांमध्ये डब करण्यात आला असून व्हिज्युअल डब या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तो मराठीसह तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशा प्रकारे अत्याधुनिक व्हिज्युअल डब तंत्रज्ञानाचा वापर करून सात भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरत आहे. त्यामुळे भारतीय चित्रपटांच्या जागतिक विस्ताराला नवी दिशा मिळणार असल्याचे मानले जात आहे.

‘गोंधळ’ चित्रपट जागतिक स्तरावर झेप घेत असतानाच आता संतोष डावखर ‘शहाजीराजे’ हा आणखी एक भव्य ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत त्यांच्या आगामी प्रकल्पाबाबतही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीने कलात्मकता आणि सामाजिक भान यांचा सुंदर मिलाफ साधणारे अनेक दिग्गज दिग्दर्शक घडवले आहेत. व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, राजा परांजपे, आचार्य अत्रे, गजानन जहागीरदार, अरविंद देशपांडे, राजदत्त, विजया मेहता, सई परांजपे, जब्बार पटेल, सुमित्रा भावे–सुनील सुकटनकर, चंद्रकांत कुलकर्णी, निशिकांत कामत, उमेश कुलकर्णी, परेश मोकाशी, गजेंद्र अहिरे, मंगेश हाडवळे, सुजय डहाके आणि नागराज मंजुळे यांसारख्या दिग्दर्शकांनी सातत्याने काळाच्या पुढचा विचार मांडणारे चित्रपट दिले आहेत. ‘गोंधळ’मुळे या समृद्ध परंपरेत संतोष डावखर या नव्या नावाची भर पडली आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि सशक्त कलात्मक दृष्टिकोन यामुळे समीक्षक आणि प्रेक्षक दोघांचेही लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले आहे.

दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात, ‘’ ‘फिप्रेस्को - इंडिया’च्या मान्यवर सदस्यांनी ‘गोंधळ’ची दखल घेतली, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. नवोदित दिग्दर्शक म्हणून ही निवड मला खात्री देते की, आपल्या संस्कृती, परंपरा आणि सामाजिक वास्तवातून जन्मलेल्या कथा समीक्षक आणि प्रेक्षक या दोघांनाही प्रभावीपणे भिडू शकतात. हा सन्मान चित्रपटाच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक कलाकार आणि तंत्रज्ञाचा आहे. यामुळे प्रामाणिक, सामाजिक भान जपणारा आणि भावनिकदृष्ट्या अर्थपूर्ण चित्रपट निर्माण करण्याची प्रेरणा मला अधिक मिळावी अशी आशा आहे.”

निर्माती दीक्षा डावखर म्हणतात, ‘’ ‘फिप्रेस्को - इंडिया ग्रँड प्रिक्स’साठी निवडलेल्या सर्वोत्तम १० चित्रपटांमध्ये ‘गोंधळ’चा समावेश होणे हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे. भारतातील आघाडीच्या चित्रपट समीक्षकांकडून मिळालेली ही दखल विशेष महत्त्वाची आहे, कारण ती चित्रपटाच्या कलात्मक दृष्टिकोनासह त्यातील सामाजिक आशयालाही मान्यता देते. ही निवड आम्हाला समकालीन समाजातील गुंतागुंतीचे वास्तव प्रतिबिंबित करणाऱ्या धाडसी आणि सांस्कृतिक मुळांशी जोडलेल्या कथा सांगण्याची प्रेरणा देते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande