
शेतकऱ्यांना ‘मोफत प्रवास आणि स्वस्त दर’चे आमिष
अमरावती, ४ मे : खरीप हंगामाची चाहूल लागताच जिल्ह्यात तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून कपाशी बियाण्यांची गुप्त आवक सुरू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमरावती शहरातील काही ठरावीक ठिकाणांवरून शेतकऱ्यांना मोफत प्रवास, बियाण्यांवर सूट आणि अधिक उत्पादनाचे आमिष दाखवून परराज्यातून बियाणे खरेदीसाठी नेण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.
विश्वासार्ह सूत्रांच्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या खासगी वाहनचालकांनाही आर्थिक लाभ दिला जात असून, त्यामुळे अनेक चालक या व्यवहारात सक्रिय झाले आहेत. शेतकरी घेऊन आल्यास चालकांना अतिरिक्त कमिशन दिले जात असल्याची चर्चा आहे.खरीप हंगामाला अजून काही आठवडे बाकी असतानाच अप्रामाणित आणि संशयित बियाण्यांची विक्री करणारे सक्रिय झाले आहेत. चोरट्या मार्गाने परराज्यातून बियाण्यांची वाहतूक होत असल्याचे संकेत आहेत. कमी दरात दर्जेदार बियाणे देण्याचे आश्वासन देत शेतकऱ्यांना आकर्षित केले जात आहे. काही प्रकरणांत वाहनभाडेसुद्धा संबंधितांकडून दिले जात असल्याचे समोर आले आहे.
या आमिषांना बळी पडून अमरावती जिल्ह्यातील अनेक शेतकरी गटागटाने तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात जाऊन बियाणे खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे. ‘मोफत प्रवास आणि स्वस्त बियाणे’ या दुहेरी लालसेमुळे शेतकरी फसवणुकीच्या जाळ्यात अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ‘ही विशिष्ट व्हरायटी अधिक उत्पादन देईल’ असा दावा करून बियाण्यांची विक्री केली जात आहे. साधारणपणे १५ मेपासून बियाणे खरेदीला सुरुवात होते, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसासह लागवडीला वेग येतो. काही शेतकरी सिंचनाच्या सुविधेमुळे मॉन्सूनपूर्व लागवडही करतात.
बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने १ जूनपूर्वी बियाणे विक्री टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेत परराज्यातील विक्रेते सक्रिय झाले असल्याचे दिसते. आलिशान वाहनांतून बियाण्यांची गुप्त वाहतूक होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कृषी विभागाकडे बोगस बियाण्यांवर कारवाईसाठी पथके असली तरी कार्यक्षेत्राबाहेरील व्यवहारांवर थेट कारवाई करणे कठीण ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचा धोका वाढला आहे. परराज्यातून आणलेले बियाणे निकृष्ट किंवा वांझ निघाल्यास न्याय मिळवणे कठीण होऊ शकते.
कृषी विभागाचे आवाहन:
शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय घाई करू नये. जिल्ह्यात कपाशी बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. परराज्यातील आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी