
परभणी, 04 मे (हिं.स.)।सोनपेठ शहरातील मोंढा परिसरात पावसाळ्यात वारंवार पाणी साचून व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेश विटेकर यांनी पावसाळा पूर्वतयारीचा आढावा घेतला.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या. नागरिक व व्यापाऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी प्रशासनाने प्रभावी पावले उचलावीत यावर भर दिला.
तसेच सोनपेठ शहरातून जाणाऱ्या 548 बी रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात संबंधित विभागाला निर्देश देण्यात आले.शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲड. श्रीकांत विटेकर, जिल्हा परिषद सदस्य मदनराव भोसले - विटेकर, नगराध्यक्ष चंद्रकांतजी राठोड, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता ( NH548 B ) प्रवीण सुमंत, कनिष्ठ अभियंता पवन लड्डा, प्रोजेक्ट मॅनेजर देवेंद्र कुमार, तांत्रिक सल्लागार मनोज जसापुरे यांच्यासह शहरातील व्यापारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis