
छत्रपती संभाजीनगर, ०४ मे (हिं.स.) : जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरात मधमाश्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये मोठी घबराट पसरली. लेणी क्रमांक १० परिसरात घडलेल्या या घटनेत सुमारे २० ते २५ पर्यटक जखमी झाले असून, नागपूर येथील एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील एक कुटुंब लेणी पाहण्यासाठी आले असताना अचानक मधमाश्यांचा मोठा थवा पर्यटकांवर तुटून पडला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला आणि पर्यटकांनी जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.
या घटनेनंतर काही काळ परिसरातील पर्यटन व्यवस्थेवर परिणाम झाला असून अनेक पर्यटकांनी भीतीपोटी वेरूळ लेणी परिसर टाळला.
प्रशासनाने तातडीने कारवाई करत धुराचा वापर करून मधमाश्यांना पांगविले. दरम्यान, या गोंधळात एका पर्यटकाचा मोबाइल हरवला होता. तो ‘एसआयएस’चे सुरक्षा रक्षक विनोद ढिवरे यांना सापडला. त्यांनी प्रामाणिकपणे संबंधित पर्यटकाला मोबाइल परत केला.
या घटनेमुळे वेरूळ परिसरातील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis