विज्ञानप्रेमींसाठी पर्वणी; अलिबागमध्ये १४ मे रोजी ‘शून्य सावली’चा अनुभव
रायगड, 04 मे (हिं.स.) : “सावली आपली साथ कधीच सोडत नाही” असे म्हटले जाते. मात्र वर्षातून दोन वेळा असा एक अनोखा खगोलीय क्षण अनुभवायला मिळतो, जेव्हा काही काळासाठी सावलीच दिसेनाशी होते. या घटनेला ‘शून्य सावली दिवस’ असे म्हटले जाते. यंदा अलिबागमध्ये हा
A treat for science lovers; Experience 'Zero Shadow' on May 14 in Alibaug


रायगड, 04 मे (हिं.स.) : “सावली आपली साथ कधीच सोडत नाही” असे म्हटले जाते. मात्र वर्षातून दोन वेळा असा एक अनोखा खगोलीय क्षण अनुभवायला मिळतो, जेव्हा काही काळासाठी सावलीच दिसेनाशी होते. या घटनेला ‘शून्य सावली दिवस’ असे म्हटले जाते. यंदा अलिबागमध्ये हा अनोखा वैज्ञानिक आणि खगोलीय अनुभव १४ मे रोजी दुपारी १२ वाजता पाहायला मिळणार आहे.

सूर्य पृथ्वीच्या विशिष्ट भागांवर अगदी ९० अंशाच्या कोनात, म्हणजेच थेट डोक्यावर येतो तेव्हा कोणत्याही उभ्या वस्तूची सावली जमिनीवर पडत नाही. ही घटना केवळ कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या मधील प्रदेशातच अनुभवता येते. त्यामुळे भारतातील विविध शहरांमध्ये वेगवेगळ्या तारखांना ‘शून्य सावली दिवस’ साजरा केला जातो.खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ७ मेपासून विविध शहरांमध्ये हा अनुभव पाहता येणार आहे. अलिबागमध्ये १४ मे रोजी दुपारी बरोबर १२ वाजता सूर्य डोक्यावर येणार असल्याने काही क्षण सावली पूर्णपणे गायब होईल.

हा अनुभव घेण्यासाठी कोणतीही उभी वस्तू, प्लास्टिकचा पाईप किंवा स्वतः उन्हात सरळ उभे राहणे पुरेसे आहे. सूर्य माथ्यावर आल्यानंतर सावली अदृश्य झाल्याचे स्पष्ट दिसून येते. हा एक वैज्ञानिक, भौगोलिक आणि गणितीय प्रयोग असून विद्यार्थ्यांसह नागरिकांनी तो प्रत्यक्ष अनुभवावा, असे आवाहन प्रा. चोपणे यांनी केले आहे.महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये हा अनुभव वेगवेगळ्या तारखांना पाहता येणार आहे. त्यानुसार ७ मे रोजी कोल्हापूर, सांगली, मिरज; १० मे रोजी सातारा; १४ मे रोजी अलिबाग, पुणे; १५ मे रोजी मुंबई; तर २६ मे रोजी नागपूर येथे शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande