अकोल्यात कचरा करावरून संताप; नागरिकांवर ६०० रुपयांचा नवा बोजा
अकोला, 04 मे (हिं.स.) : महापालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतर शहरातील नागरिकांवर कचरा संकलनाच्या नावाखाली दरवर्षी ६०० रुपयांचा कर लादण्याचा निर्णय घेण्यात आल्याने अकोलेकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आधीच विविध करांच्या ओझ्याखाली दबलेल्या नागरिकां
Photo


अकोला, 04 मे (हिं.स.) : महापालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतर शहरातील नागरिकांवर कचरा संकलनाच्या नावाखाली दरवर्षी ६०० रुपयांचा कर लादण्याचा निर्णय घेण्यात आल्याने अकोलेकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आधीच विविध करांच्या ओझ्याखाली दबलेल्या नागरिकांना हा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत असल्याने मनपाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, कचरा कराची वसुली सुरू असतानाच शहरातील घंटागाडी सेवा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. अनेक भागांत घंटागाड्या वेळेवर न येणे, काही ठिकाणी सेवा पूर्णपणे बंद पडणे, तसेच कचऱ्याचे ढिग साचण्याचे प्रकार वाढल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही संभाव्य धोका निर्माण झाल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार साजिद खान पठाण यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. “विकासाच्या नावाखाली जनतेची आर्थिक कोंडी करणे योग्य नाही. शहराच्या प्रगतीसाठी आम्ही सकारात्मक आहोत; मात्र करांच्या माध्यमातून नागरिकांची पिळवणूक सहन केली जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

‘डर्टी टॅक्स’च्या नावाखाली आधीच नागरिक त्रस्त असताना त्यात आणखी ६०० रुपयांचा कचरा कर लादणे म्हणजे सामान्य माणसाच्या सहनशीलतेची परीक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, सत्ताधाऱ्यांनी कर वाढवण्याऐवजी पर्यायी उत्पन्नाचे स्रोत शोधण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मनपाने स्वतःच्या मालकीच्या मोक्याच्या जागांचा योग्य वापर करून महसूल वाढवावा, अशी मागणी करत त्यांनी मुख्य बाजारपेठेतील दानाबाजार परिसरात आधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा प्रस्ताव मांडला. यामध्ये विद्यमान व्यापाऱ्यांना प्राधान्य देत सवलती देण्याची सूचनाही त्यांनी केली.

“शहर विकासाच्या चांगल्या उपक्रमांना आमचा पाठिंबा राहील, मात्र नागरिकांच्या खिशावर डल्ला मारणारे निर्णय आम्ही सहन करणार नाही,” असा इशारा देत त्यांनी सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले.

यावेळी मनपाचे विरोधी पक्षनेते डॉ. झिशान हुसैन, कपिल रावदेव, नगरसेविका प्रिया अश्विन शिरसाट, आर्शिया परवीन, निखत परवीन, निलोफर खान, आकाश कवडे, गुड्डू पठाण, मोहम्मद शारिक यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande