छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदार मॅपिंगला वेग; ७४.४२ टक्के काम पूर्ण
छत्रपती संभाजीनगर, ०४ मे (हिं.स.) : यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला (एसआयआर) जिल्ह्यात वेग आला असून, आतापर्यंत ७४.४२ टक्के मतदार मॅपिंग पूर्ण झाले आहे. नागरिकांनी घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य माहिती
छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदार मॅपिंगला वेग; ७४.४२ टक्के काम पूर्ण


छत्रपती संभाजीनगर, ०४ मे (हिं.स.) : यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला (एसआयआर) जिल्ह्यात वेग आला असून, आतापर्यंत ७४.४२ टक्के मतदार मॅपिंग पूर्ण झाले आहे. नागरिकांनी घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य माहिती द्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी सरिता चौधरी यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात एकूण ३२,४७,०९४ मतदारांपैकी ३० एप्रिलपर्यंत २४,१६,६१८ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे.

शहरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मॅपिंगचे प्रमाण तुलनेने कमी असून ते सध्या ५० ते ६० टक्क्यांच्या दरम्यान असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी हे मॅपिंग महत्त्वाचे मानले जात आहे.

या प्रक्रियेमुळे स्थलांतरित, मृत किंवा अनुपलब्ध मतदारांची नोंद दुरुस्त करता येते तसेच पात्र नागरिकांची नावे योग्य ठिकाणी समाविष्ट केली जातात.

फुलंब्री, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद पूर्व या चार विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष आढावा बैठका घेण्यात आल्या. संबंधित अधिकाऱ्यांना कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, १० मेपर्यंत किमान ९० टक्के मॅपिंग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या प्रक्रियेत लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि बूथ लेव्हल एजंट यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावरही भर देण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande