आठवडी बाजार बंदीविरोधात उबाठा- गटाचे गांधीगिरी आंदोलन
छत्रपती संभाजीनगर, ०४ मे (हिं.स.) : शहरातील आठवडे बाजार बंद करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी गांधीनगर येथील जुन्या बाजार परिसरात आंदोलन केले. “बिल्डरांच्या घशात भूखंड घालू नका” आणि “जनतेच्या रोजगारावर
आठवडी बाजार बंदीविरोधात उबाठा- गटाचे गांधीगिरी आंदोलन


छत्रपती संभाजीनगर, ०४ मे (हिं.स.) : शहरातील आठवडे बाजार बंद करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी गांधीनगर येथील जुन्या बाजार परिसरात आंदोलन केले. “बिल्डरांच्या घशात भूखंड घालू नका” आणि “जनतेच्या रोजगारावर गदा आणू नका” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला.

महापालिकेने शहरातील आठवडे बाजार बंद करून त्या ठिकाणी व्यापारी संकुले उभारण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक छोट्या व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात येईल, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

या पार्श्वभूमीवर “चला... बाजाराला चला...” अशा घोषणा देत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांनी केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, नगरसेवक सचिन खैरे, प्रमोद ठेंगडे तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यापूर्वी शहानूरवाडी आणि चिकलठाणा येथील आठवडे बाजारातही आंदोलन करत विक्रेत्यांशी संवाद साधण्यात आला होता. त्या वेळी विक्रेत्यांनी “आम्ही जगायचे कसे?” असा सवाल उपस्थित केला होता.

गांधीनगर येथील आंदोलनादरम्यान पदाधिकाऱ्यांनी आठवडे बाजार बंद होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत विक्रेत्यांना दिलासा दिला.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande