
नांदेड, 04 मे (हिं.स.)।
भारतीय स्टेट बँकेत सध्या चलनाचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्यामुळे नागरिकांसह शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. विशेषतः लग्नसराईचा हंगाम सुरू असताना रोख रक्कम मिळत नसल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे.
बँकेत पैसे काढण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना पुरेशी रोकड उपलब्ध होत नसल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागते. काहींना मर्यादित रक्कम दिली जात असल्याने लग्नकार्य, खरेदी-विक्री आणि इतर महत्त्वाच्या व्यवहारांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात डिजिटल व्यवहारांची मर्यादित सोय असल्यामुळे रोख रकमेवर अवलंबून असलेल्या नागरिकांना याचा अधिक फटका बसत आहे. दरम्यान, शेतकरी वर्गाची
परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. सध्या शेतीच्या मशागतीचा हंगाम सुरू असून, बियाणे, खते आणि इतर साहित्य खरेदीसाठी पैशांची गरज असताना बँकेतून रोकड मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी आपली हळद विक्री करून त्याचे पैसे खात्यात जमा झाले असले तरी प्रत्यक्षात ते काढता येत नसल्याने त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. ग्राहकांना नियमित सेवा द्यावी आणि या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis