
विद्याभारतीच्या दहा दिवसीय शिशुवाटिका आचार्य प्रांत प्रशिक्षण वर्गास प्रारंभ
परभणी, 04 मे (हिं.स.)।
राष्ट्र उभारणीत शिक्षणाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण आवश्यक आहे, असे प्रतिपादन विद्याभारती देवगिरी प्रांतचे उपाध्यक्ष प्रकाश पोतदार यांनी केले.
विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थानशी संलग्न विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षण संस्थेच्या परभणी शाखेतर्फे आयोजित दहा दिवसीय शिशुवाटिका आचार्य प्रांत प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम राजे संभाजी गुरुकुल येथे पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याभारती देवगिरी प्रांतचे अध्यक्ष डॉ. विवेक काटदरे हे होते, तर व्यासपीठावर सुरेखाताई सोनार उपस्थित होत्या. प्रांत संघटन मंत्री शैलेश जोशी यांनी शिक्षार्थी आचार्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक करताना पोतदार यांनी सांगितले की, विद्याभारती ही शिक्षण क्षेत्रात कार्य करणारी प्रभावी व मूल्याधिष्ठित संस्था असून सा विद्या या विमुक्तये या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी कार्यरत आहे. भारतीयत्व जपत शिक्षण देणे हे विद्याभारतीचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी नमूद केले. देशभरात विद्याभारतीच्या सुमारे 25 हजार शाळा कार्यरत असून त्यामध्ये एक लाख 25 हजार शिक्षक कार्यरत आहेत, तसेच सुमारे सात लाख 50 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. सन 1952 मध्ये कुरुक्षेत्र येथे सुरू झालेली ही चळवळ आज देशाच्या सर्वच प्रांतांमध्ये विस्तारली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रशिक्षण वर्गात देवगिरी प्रांतातील शिशुवाटिका आचार्य मोठ्या संख्येने सहभागी झाले असून हा वर्ग 13 मेपर्यंत चालणार आहे. प्रशिक्षणादरम्यान वैदिक गणित व कार्यकर्ता विकासाशी संबंधित विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis