
लातूर, 04 मे (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाने २०१७ मध्ये जाहीर केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ अंतर्गत कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील शेतकऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे.या प्रकरणात तांत्रिक अडथळे दूर करून पात्र शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफीचा लाभ देण्याचे आदेश न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत.
रेणापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीतील अनेक पात्र खातेदार व कर्जदार शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले होते. वारंवार पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने अखेर शेतकऱ्यांनी न्यायालयाचा मार्ग स्वीकारला.
या प्रकरणात गंगाधर मारुती कटके, लिमनअप्पा पनुरे, पंचअक्षरी गिरवलकर, नरहरी डावळे, विठ्ठल सिरसकर, सुरेश सौदागर यांसह शेतकऱ्यांच्या वतीने अॅड. शैलेंद्र गंगाखेडकर यांनी रिट याचिका दाखल केली होती.
२२ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या अंतिम सुनावणीत न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती वैशाली जाधव यांच्या खंडपीठाने शासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. लोककल्याणकारी योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात झालेल्या विलंबावर न्यायालयाने ताशेरे ओढले.
यानंतर न्यायालयाने शासनाला पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ तात्काळ देण्याचे स्पष्ट आदेश दिले असून, या निर्णयामुळे रेणापूर परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे
-----------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis