
नांदेड, 04 मे (हिं.स.) : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या तेल कंपनीने नांदेड येथे आपले नवीन प्रादेशिक कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मराठवाडा आणि विदर्भातील सात जिल्ह्यांतील पेट्रोलियम सेवा व्यवस्थापन अधिक सुलभ होणार आहे.
या नव्या प्रादेशिक कार्यालयांतर्गत नांदेडसह लातूर, परभणी, हिंगोली, अकोला, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश असेल. या भागातील सुमारे ३०० पेट्रोल पंप आता थेट नांदेड कार्यालयाशी जोडले जाणार आहेत.
यापूर्वी हे सर्व जिल्हे सोलापूर प्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत येत होते. मात्र, भौगोलिक अंतर आणि प्रशासकीय अडचणी लक्षात घेता नांदेडमध्ये स्वतंत्र कार्यालयाची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. ही मागणी अखेर पूर्ण झाली आहे.
एचपीसीएलचे प्रादेशिक व्यवस्थापक संतोष कुमार आणि क्षेत्र विक्री व्यवस्थापक तन्मय कोमटी यांनी खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेऊन नवीन कार्यालयाच्या कामकाजाबाबत माहिती दिली.
या कार्यालयात सुमारे १५ ते २० कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत राहणार असून, वितरण व्यवस्थापन, देखभाल आणि नवीन सेवांच्या अंमलबजावणीला आता अधिक गती मिळणार आहे. या निर्णयामुळे संबंधित जिल्ह्यांतील पेट्रोल पंप व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis