सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासूला १० वर्षे सक्तमजुरी
रत्नागिरी, 04 मे (हिं.स.) । डेरवण (ता. चिपळूण) येथील ६ महिने गरोदर विवाहितेचा एक लाख रुपयांच्या मागणीसाठी छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी आरोपी पती दिनेश महादेव कदम (वय ३४ वर्षे
सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासूला १० वर्षे सक्तमजुरी


रत्नागिरी, 04 मे (हिं.स.) । डेरवण (ता. चिपळूण) येथील ६ महिने गरोदर विवाहितेचा एक लाख रुपयांच्या मागणीसाठी छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी आरोपी पती दिनेश महादेव कदम (वय ३४ वर्षे) व सासू मीनाक्षी महादेव कदम (वय ५७ वर्षे) या दोन आरोपींना १० वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ३५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास प्रत्येकी ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

गुन्ह्याबाबत थोडक्यात हकिकत अशी की, हा गुन्हा सावर्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. त्यातील मयत काव्या दिनेश कदम (वय २५ वर्षे) हिने घराशेजारील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तिचा विवाह दिनांक १५/०५/२०१५ रोजी आरोपी दिनेश याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर सुमारे ४ महिन्यांतच तिचा पती व सासू यांनी गाडीसाठी रुपये १ लाख रुपये माहेरहून आणण्याबाबत तगादा लावला. तसेच त्या कारणावरून मयत हिला धर्मपत्नीचा दर्जा न देता पतीने मारझोड केली व घराबाहेर काढले. घराच्या शेडमध्ये राहण्यास सांगितले. सासू मीनाक्षी महादेव कदम हिने घरातील कामावरून तसेच किरकोळ कारणावरून सतत टोचून बोलून सुनेचा वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास देऊन छळ-जाच केला. दोन्ही आरोपी मयत काव्या हिला विहिरीला पंप असतानासुद्धा हाताने पाणी काढायला लावत. खर्चाला पैसे देत नसत. १ लाख रुपयाची मागणी माहेरच्यांनी पूर्ण केली नसल्यामुळे तिला अपमानित करुन एकटीला सतत माहेरी पाठवत.

त्यांच्या वादाबाबत दोन्ही नातेवाईकांच्याकरवी बैठकसुद्धा घेण्यात आल्या होत्या. परंतु आरोपींच्या वागण्यात कोणताही फरक पडला नव्हता. गर्भवती असतानादेखील आरोपींनी वारंवार पैशाचा तगादा लावून तिचे जगणे असह्य केले. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने तिने सासरच्या घरासमोरीलच विहिरीत गर्भवती असताना दि. २१/११/२०१६ रोजी उडी मारून आत्महत्या केली.

आरोपी पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यावर सावर्डे पोलिसांनी न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. या सत्र खटल्याची सुनावणी चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांच्यासमोर सुरू होती. सरकारी वकील प्रफुल्ल साळवी यांनी एकूण ८ साक्षीदार तपासले. मयत हिची आई, भाऊ व शेजारी तसेच सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शरद कुवेस्कर व सचिन इंगोले यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. आरोपीतर्फे ३ साक्षीदार बचावासाठी तपासण्यात आले होते.

सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर प्रभावी युक्तिवाद मांडला व त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी पती दिनेश महादेव कदम व सासू मीनाक्षी महादेव कदम यांना जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी दोषी ठरवून १० वर्षे सक्तमजुरी

आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास आणि ३ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. आरोपीतर्फे शिक्षेबाबत न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना त्याचे दुसरे लग्न केले असून त्याला एक मुलगी आहे व त्याचे वडील ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यामुळे कमीत कमी शिक्षेची मागणी केली, मात्र न्यायालयाने मयत काव्या आत्महत्या करताना ६ महिन्यांची गरोदर होती. त्यामुळे यामध्ये दोन निष्पाप जीव गेल्याने गुन्ह्याची गंभीरता विचारात घेऊन कायद्याने दिलेली १० वर्षांची शिक्षा आरोपींना दिली.

सत्र खटल्याकामी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील साळवी यांनी काम पाहिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande