अमरावतीत प्रो-ऍक्टिव्ह पोलिसिंगवर भर - पोलिस अधीकक्ष
अमरावती, 04 मे (हिं.स.) : गुन्हा घडण्याची वाट न पाहता तो घडूच नये यासाठी जिल्ह्यात प्रो-ऍक्टिव्ह पोलिसिंगवर भर दिला जाणार असल्याची माहिती अमरावतीचे नवे पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी दिली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी
सुधर जाओ, वर्णा आपका समय... नवे एसपी निकेतन कदम यांचा अॅक्शन प्लॅन तयार


अमरावती, 04 मे (हिं.स.) : गुन्हा घडण्याची वाट न पाहता तो घडूच नये यासाठी जिल्ह्यात प्रो-ऍक्टिव्ह पोलिसिंगवर भर दिला जाणार असल्याची माहिती अमरावतीचे नवे पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी दिली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

२०१९ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले कदम यांनी आपल्या पोलिस सेवेत अमरावती ग्रामीण, लातूर आणि नागपूर शहर येथे विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. अमरावती ग्रामीणमधील परिविक्षाधीन कालावधीनंतर त्यांनी एएसपी लातूर आणि नागपूर शहर पोलिस उपायुक्त म्हणून काम केले असून, पदोन्नतीनंतर ते अमरावतीचे पोलिस अधीक्षक म्हणून रुजू झाले आहेत.

आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रवासाबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, ते मूळचे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील असून, त्यांनी पॉलिटेक्निक आणि अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आहे. मुंबईतील एका आयटी कंपनीत दोन वर्षे नोकरी करत असताना त्यांनी यूपीएससीची तयारी केली आणि त्यातून ते भारतीय पोलिस सेवेत दाखल झाले. त्यांचे वडील महावितरणमध्ये वायरमन म्हणून कार्यरत होते.

नव्या धोरणाबाबत बोलताना कदम यांनी स्पष्ट केले की, गुन्हेगारी रोखणे (Crime Prevention) आणि गुन्हे उघड करणे (Detection) यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिस दलाचे महत्त्वाचे व आव्हानात्मक काम असून, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

अवैध व्यवसायांवर कडक कारवाईचा इशारा देताना त्यांनी सांगितले की, अशा कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांवर कोणतीही सवलत दिली जाणार नाही.

गुन्हेगारांना स्पष्ट इशारा देत ते म्हणाले, “सुधर जाओ, अन्यथा तुमचा वेळ लवकरच येणार आहे.” तसेच गंभीर गुन्हेगारांवर मकोका, एमपीडीए आणि हद्दपारीसारख्या कठोर कायद्यांचा प्रभावी वापर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande