
परभणी, 04 मे (हिं.स.)।
शहरातील सावली विश्रामगृह येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बैठक उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. बैठकीत पक्षाच्या आगामी अभियानांचे नियोजन, संघटन बळकटीकरण तसेच कार्यपद्धती यावर सखोल व व्यापक चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान जिल्हा प्रभारी प्रवीण घुगे यांनी उपस्थित पदाधिकार्यांना मार्गदर्शन करत आगामी कामकाजासाठी स्पष्ट दिशा दिली. संघटन अधिक सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध कार्य, संवाद वाढविणे आणि प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय भूमिका घेण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. यावेळी भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, मीना परतानी, मोकिंद खिल्लारे, सुनील देशमुख, मंगल मुदगलकर, मनीषा जाधव, डॉ. केदार खटिंग यांसह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.
बैठकीत आगामी अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने आणि कटिबद्धतेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. संघटन अधिक बळकट करून जनतेपर्यंत पक्षाचे विचार प्रभावीपणे पोहोचवण्यावर भर देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis