
जळगाव , 04 मे (हिं.स.) जळगाव महानगरपालिकेच्या सभागृहात आज सोमवार, ४ मे रोजी सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा पार पडली. या सभेत शहरातील अतिक्रमण, नालेसफाई, कचरा संकलन, शाळांची स्थिती आणि डिझेल खरेदी यांसारख्या विविध प्रलंबित आणि गंभीर प्रश्नांवरून नगरसेवकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. विशेष यावेळी एक मोठी घोषणा करण्यात आलीय. मनपा शाळांमध्ये ‘सेमी इंग्लिश’ माध्यम सुरू करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी केली.
या बैठकीला मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त पंकज गोसावी, उपायुक्त निर्मला गायकवाड आणि नगरसचिव सतीश शुक्ला यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून जळगाव येथील जैन मंदिराभोवतीचे अतिक्रमण हटवण्याच्या थेट सूचना दिल्या होत्या. तरीही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई का झाली नाही? मुख्यमंत्र्यांच्या फोननंतरही कारवाई होणार नसेल तर आम्ही आंदोलन करायचे का?” असा संतप्त सवाल शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे यांनी उपस्थित केला.
शहरातील सुभाष चौक, महात्मा फुले मार्केट परिसरातील अतिक्रमणाकडे लक्ष वेधत विष्णू भंगाळे यांनी संडे बाजारामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा पाढा वाचला. सुट्टीच्या दिवशी अतिक्रमण विभागाचे फोन बंद असतात, असा आरोप त्यांनी केला. यावर उपायुक्त पंकज गोसावी यांनी, आता सुट्टीच्या दिवशीही गस्ती पथक तैनात करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
मनपा शाळांमधील घटत्या पटसंख्येबाबत सदस्यांनी चिंता व्यक्त केली. शाळांच्या इमारती चांगल्या असतानाही विद्यार्थी संख्या का कमी होत आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तोडगा काढत, आगामी शैक्षणिक वर्षापासून मनपा शाळांमध्ये ‘सेमी इंग्लिश’ माध्यम सुरू करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी केली. यामुळे शाळांचा दर्जा उंचावेल आणि पालकांचा कल मनपा शाळांकडे वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभागृह नेते नितीन लढ्ढा यांनी शहरातील वाहतूक कोंडीकडे लक्ष वेधले. अधिकृत थांबे असतानाही अनेक रिक्षा चालक रस्त्यावरच वाहने उभी करतात. अनेक रिक्षा चालकांची नोंदणी नसल्यामुळे समस्या अधिक गंभीर होत असून अशा बेशिस्त रिक्षा चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर