
जळगाव , 04 मे (हिं.स.) महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील प्रमुख शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी अमृत भारत एक्स्प्रेसच्या दोन महत्त्वाच्या गाड्यांच्या नियमित सेवांना प्रारंभ करण्यात आला आहे. विशेष या दोन्ही गाड्या जळगाव आणि भुसावळ मार्गे धावणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या दोन्ही गाड्यांचे आरक्षण २ मे २०२६ पासून सर्व संगणकीकृत केंद्र (आरक्षण खिडक्या) आणि आयआरसीटीसी (IRCTC) च्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू झाले आहे.गाडी क्रमांक २२५९० (हडपसर ते बनारस) ही गाडी आज म्हणजेच ४ मे पासून ही गाडी दररोज सकाळी ७:५० वाजता हडपसर येथून सुटेल आणि जळगावला दुपारी ३.२२ वाजता तर भुसावळ येथे दुपारी ४:०० वाजता येईल. यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी २:३० वाजता बनारस येथे पोहोचेल.गाडी क्रमांक २२५८९ (बनारस ते हडपसर) ही २ मे पासून ही गाडी दररोज सायंकाळी ६:१५ वाजता बनारस येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी भुसावळ येथे दुपारी ३:१५ वाजता तर जळगावला दुपारी ३.४५ वाजता येईल. यानंतर तिसऱ्या दिवशी रात्री १२:१० वाजता हडपसर येथे पोहोचेल.दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, नर्मदापुरम, राणी कमलापती (भोपाळ), बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, गोविंदपुरी, फतेहपूर, प्रयागराज जंक्शन आणि ज्ञानपूर रोड वर थांबा राहील. गाडी क्रमांक २२१११ (एलटीटी ते अयोध्या कॅन्ट) ही गाडी उद्या म्हणजेच ५ मे पासून प्रत्येक मंगळवारी सकाळी ७:५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथून सुटेल आणि जळगावला दुपारी २.२३ वाजता तर भुसावळ येथे दुपारी ३:२० वाजता येईल. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी १०:१५ वाजता अयोध्या येथे पोहोचेल. गाडी क्रमांक २२११२ (अयोध्या कॅन्ट ते एलटीटी) ही गाडी ६ मे पासून प्रत्येक बुधवारी दुपारी १:५० वाजता अयोध्येवरून सुटेल आणि भुसावळ येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.०५ वाजता, तर जळगावला ८.३३ वाजता येईल. यांनतर दुपारी ३:४५ वाजता मुंबईत (LTT) पोहोचेल. अयोध्येतील रामललाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ही गाडी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिकरोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज, प्रतापगड आणि सुलतानपूर स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर