
परभणी, 04 मे (हिं.स.)।
गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळूउपसा राजरोस सुरू असून अवैध वाळूउपसा करणाऱ्या ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या व आर्थिक हितसंबंध जोपासणऱ्या महातपूरी व खळी येथील तलाठी व मंडलाधिका-यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी गंगाखेड तालुक्यातील महातपुरी परिसरातील गोदावरी नदीपात्रात सोमवारी(दि. ४)जलसमाधी आंदोलन करण्यात आले. प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या पंचनामा व लेखी आश्वासनाने आंदोलन स्थगित करण्यात आले. तसेच कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
गंगाखेड तालुक्यातील महातपुरी तसेच खळी हद्दीत अवैध व नियमबाह्य पद्धतीने कंत्राटदाराकडून वाळूउपसा होत असून त्यासाठी अजस्त्र यंत्राचा वापर केला जात आहे. मोठे पोकलेन, ट्रेक्टर रापी व बोटी लावून खोल पाण्यातून वाळू चोरी व उपसा केला जात आहे. वेळेचे निर्बंध डावलून रात्रंदिवस वाळूउपसा चालू आहे. पर्यावरण विभागाने घालून दिलेले नियम राजरोसपणे मोडले जात आहे, असा आरोप करत हे जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या प्रकारणी वारंवार खळी व महातपुरीच्या तलाठी तसेच मंडळाधिकारी यांना कळविले, वाळूउपशाचे पुरावे देऊनही कसलीही कारवाही होत नाही, महसूली अधिकारी हप्ते घेत असल्याचेही यावेळी आंदोलनकांनी सांगितले. चिंचटाकळी रेतीघाटातून नियमबाह्य वाळू वाहतूक केली जात असुन खळी ओढापूलास भेगा पडल्याने कोणत्याही क्षणी पूल कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली, यामुळे खळी, चिंचटाकळी, गौंडगाव, मैराळ सांवगी रस्ता कायमस्वरूपी बंद होऊन विद्यार्थी व शेतक-यांचे नुकसान संभवत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, खळी ग्रामस्थांच्या वतीने वाळूचोरी व प्रशासनाच्या उदासिनतेविरुद्ध गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी स्थळपाहणी पंचनामा करून कारवाईचे आश्वासन देण्यात आले. पण आजतागायत आश्वासनाची पुर्तता करण्यात आली नाही. पर्यावरणाचा -हास होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, स्वच्छ, सुरक्षित व पाणीनिचरा यावर विपरीत परिणाम होवून परिसरात विहीर व बोर कोरडे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे गावकऱ्यांना दूषित पाणी, पाणीटंचाई तथा रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या आंदोलन किसानसभेचे जिल्हा सेक्रेटरी कॉ. ओंकार पवार, बाबासाहेब कुगे, वामन ढोबळे, अनिल देशमुख, शेषराव सुरवसे, प्रदिप गौरशेटे, उत्तम दसवंते, मावली करवर यांचा सहभाग होता. यावेळी नायब तहसीलदार अहमद अजिम, मंडळाधिकारी महातपुरी, गंगाखेड मंडळाधिकारी तसेच मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis