
छत्रपती संभाजीनगर, 04 मे (हिं.स.): सुरवातीपासून मका उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. खरीप हंगामातील मक्याला केवळ ९०० ते १६०० रुपयांपर्यंतचा भाव मिळाला. उन्हाळी मक्याला २ हजार रुपयांपेक्षा अधिक भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, सुरवातीच्या दिवसांतच १६०० ते १८०० रुपयांचा भाव मिळत असल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची निराशा झाली.
२०२५-२६ या आर्थिक वर्षांत वरुणराजा सर्वत्र धो-धो बसरला. तलाव, विहिरी तुडूंब भरल्या. परिणामी, जमिनीत जलसाठा वाढला. यामुळे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील पिके चांगलीच बहरली आणि उत्पन्नातही वाढ झाली. त्यातच यंदा
मक्याचा पेरा अधिक असल्याने बाजारात आवक वाढली. शासनाने २४०० रुपयांचा हमीभाव जाहीर केला. मात्र, खरेदी केंद्रे सुरू करण्यास उशीर केला. त्यामुळे खुल्या बाजारात व्यापाऱ्यांनी साखळी केल्याने खरीप हंगामातील मक्याचे भाव सुरवातीपासून गडगडल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त अहवालानुसार जाधववाडी मोंढ्यात ८६,४४९ क्विंटल आवक झाली. यात ऑक्टोबर ते मार्चपर्यंत दाखल झालेल्या मक्याला ९०० ते १६०० रुपयांपर्यंतचा भाव मिळाला.खर्चाचे गणित पाहता खरीप हंगामातील बहुतांश शेतकऱ्यांचा मका विक्रीतून केवळखर्चच वसूल झाला. त्यानंतर उन्हाळी मक्याला चांगला भाव मिळेल, अशी आशा होती. मात्र, येथेही भाव पडलेले असल्याने शेतकरी अस्वस्थ झाले. पुढील खरीप हंगामात दुष्काळस्थिती राहिल्यास शेतकरी पुन्हा अडचणीत येईल.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis