
अमरावती, ४ मे (हिं.स.): अचलपूर-परतवाडा परिसरात रविवारी सायंकाळी अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे मोठी खळबळ उडाली. या आगीत ‘आदर्श फर्निचर’सह सुमारे 6 ते 7 दुकाने पूर्णतः जळून खाक झाली असून व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ‘आदर्श फर्निचर’ या दुकानातून आगीची सुरुवात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण करत संपूर्ण परिसराला वेढा घातला. ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरूनही दिसत होते, त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
दुकानमालक प्रविण गजानन बालापुरे यांनी अवघ्या एका वर्षापूर्वी सुमारे 12 लाखांचे कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला होता. मात्र या आगीत संपूर्ण माल, साहित्य आणि दुकान जळून खाक झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
घटनेची माहिती मिळताच अचलपूर, चांदूर बाजार, दर्यापूर आणि चिखलदरा येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अनेक तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. या काळात पोलिस प्रशासन, नगरपरिषद अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनीही बचावकार्यात सहभाग घेतला.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने व्यापारी वर्गात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही
----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी