
छत्रपती संभाजीनगर, ०४ मे (हिं.स.) : शहरातील बाजारात मागील महिनाभरापासून भाजीपाल्यांच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. टोमॅटो आणि बटाट्यांचे भाव वाढून आता ३० रुपये किलोवर पोहोचले आहेत.
जाधववाडी भाजीमंडईत आवक वाढलेली असतानाही किरकोळ बाजारात या भाज्यांच्या दरात प्रति किलो सुमारे १० रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी टोमॅटो व बटाटे २० रुपये किलोने मिळत होते.
दरम्यान, शहरातील औरंगपुरा, गुलमंडी, टीव्ही सेंटर, शहागंज, मुकुंदवाडी आणि चिकलठाणा परिसरातील किरकोळ बाजारात काही भाज्यांचे दर मात्र स्थिर राहिल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. वांगे ३० रुपये किलो आणि भोपळा ३० ते ४० रुपये किलो दराने उपलब्ध आहे.
काकडी आणि कोबी दर्जानुसार ४० ते ६० रुपये, गाजर ४० ते ५० रुपये, भेंडी ५० रुपये आणि वाल ५० ते ६० रुपये किलो दराने विकले जात आहेत. अद्रक ६० ते ८० रुपये, तर लसूण २०० रुपये किलोवर स्थिर आहे.
कारले, गिलके आणि दोडके यांचे दर ८० रुपयांपर्यंत कायम असून लिंबाचे भाव १६० ते २०० रुपये किलोदरम्यान आहेत. लग्नसमारंभात वापरली जाणारी गोड कैरी ५० रुपये किलोने उपलब्ध असल्याने तिची मागणी वाढली आहे.
दुसरीकडे सिमला मिरची, हिरवी मिरची आणि शेवगा ६० रुपये किलो दराने मिळत आहेत, तर पालेभाज्या १५ रुपये जुडीप्रमाणे विकल्या जात आहेत. बाजारात स्वस्त आणि महाग अशा दोन्ही प्रकारच्या भाज्या उपलब्ध असल्याने ग्राहक स्वस्त पर्यायांकडे अधिक वळताना दिसत आहेत.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis