
परभणी, 04 मे (हिं.स.)। जांब येथे बालविवाह प्रतिबंधासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हा कार्यक्रम सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभाग अंतर्गत अभ्यासक्रमातील “पालक शिक्षण कार्यक्रमाचा बालविवाह प्रतिबंधावर होणारा परिणाम” या संशोधन विषयाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आला. प्रारंभी डॉ. वीणा भालेराव, प्राध्यापक तथा विभाग प्रमुख यांनी बालविवाह या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी बालविवाहाची कारणे, त्याचे मुलीवर, कुटुंबावर व एकंदरीतच संपूर्ण भावी पिढ्यांवर होणारे दुष्परिणाम तसेच हुंडा प्रथेचे दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती विस्तृतपणे सांगितली. यानंतर विद्यार्थिनींनी “बालविवाह थांबवा, मुलींचे भविष्य वाचवा” या विषयावर नाटिका सादर केली. या नाट्यप्रयोगाद्वारे ग्रामीण मुली व मातांसमोर प्रभावीपणे बालविवाहाचे दुष्परिणाम मांडण्यात आले. विद्यार्थिनींनी ग्रामस्थांना बालविवाहाचे परिणाम, हुंडा प्रथा तसेच मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व याबाबत टप्प्याटप्प्याने सविस्तर माहिती देऊन जनजागृती केली.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील पालक व नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होऊन बालविवाह प्रतिबंधासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या उपक्रमात सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गावातील सर्व अंगणवाडीताई तसेच माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक यांचे सहकार्य लाभले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis