मेळघाटात भीषण पाणीटंचाई; सीईओ सत्यम गांधींचा मॅरेथॉन दौरा
अमरावती, ४ मे (हिं.स.): मेळघाटातील अनेक गावांमध्ये निर्माण झालेल्या गंभीर पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी थेट दुर्गम भागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील गावांचा त्य
सत्यम गांधींची 'सिंघम' स्टाइल कारवाई; महिलांचे हाल पाहून थेट आदेश, अधिकाऱ्यांनाही अल्टिमेटम ५ दिवसात समस्या सुटल्या नाही तर थेट निलंबनाची होणार कारवाई


अमरावती, ४ मे (हिं.स.): मेळघाटातील अनेक गावांमध्ये निर्माण झालेल्या गंभीर पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी थेट दुर्गम भागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील गावांचा त्यांनी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत मॅरेथॉन दौरा करत प्रत्यक्ष परिस्थितीचा अनुभव घेतला.

तारूबांदा गावात महिलांना विहिरीतून हाताने पाणी काढून डोक्यावरून वाहून नेत असल्याचे दृश्य पाहून सीईओ गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प असल्याचे समोर आले असून त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

विहिरीवर जाळी बसवणे, १५व्या वित्त आयोगातून मोटर आणि स्टँडपोस्ट उभारणे तसेच टेंडर प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश त्यांनी ग्रामपंचायतीला दिले आहेत. सौरऊर्जेवर आधारित पंप सुरू होईपर्यंत तात्पुरती व्यवस्था उभारण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, पुढील पाच दिवसांत समस्या सुटली नाही तर संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. धारणी तालुक्यातील कढाव येथे ग्रामस्थांनी थेट अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी केल्यानंतर त्यांनी गट विकास अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे निर्देश दिले.

या दौऱ्यात कोहाना, बिहाली, माखला, टेमभूरढाणा, भिलोजा, राक्षा, आढाव, ढाकणा, सावऱ्या, बोरिखेडा अशा अनेक गावांचा समावेश होता. प्रत्येक ठिकाणी त्यांनी थेट ग्रामस्थांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या आणि जागीच उपाययोजना सुचवल्या.

माखला येथे आरोग्य उपकेंद्रातील इन्व्हर्टर बंद असल्याचे दिसताच बॅटरी बदलण्याचे आदेश देण्यात आले. अंगणवाडीतील डिजिटल टीव्ही दुरुस्तीचेही निर्देश त्यांनी दिले. आढाव गावात स्वतः टॅबद्वारे पाणीपुरवठा प्रणाली तपासून दररोज सकाळी नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले.

मेळघाटातील पाणीटंचाई आणि मूलभूत सुविधांच्या गंभीर परिस्थितीमुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून, या दौऱ्यानंतर तातडीच्या उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande