मराठवाड्यात इंधन तुटवड्यामुळे जनजीवन विस्कळीत; पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’ फलक
बीड, ०४ मे (हिं.स.) : बीडसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीमुळे सामान्य जनजीवनासह शेती व वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक पेट्रोल पंपांवर ‘
मराठवाड्यात इंधन तुटवड्यामुळे जनजीवन विस्कळीत; पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’ फलक


बीड, ०४ मे (हिं.स.) : बीडसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीमुळे सामान्य जनजीवनासह शेती व वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.

अनेक पेट्रोल पंपांवर ‘साठा नाही’ असे फलक झळकताना दिसत असून, ग्रामीण भागात ही परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. पंपचालकांनी मोठी रक्कम आगाऊ भरूनही इंधन वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.

तेल कंपन्यांनी यापूर्वी दिलेली पाच दिवसांची क्रेडिट सुविधा बंद केल्याने आणि आता आगाऊ रक्कम घेऊनही पुरवठा अनियमित झाल्याने परिस्थिती आणखी बिघडली आहे. इराण–अमेरिका तणावासह जागतिक घडामोडींचा हवाला देत ही बदललेली धोरणे लागू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

डिझेलअभावी शेतीची कामे ठप्प झाली असून, मालवाहतूकही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. यामुळे मराठवाड्यातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे.

पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब रांगा लागत असून, तासनतास थांबूनही इंधन मिळेल याची शाश्वती नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. कर्मचारी आणि पंपचालक ग्राहकांच्या रोषाला सामोरे जात आहेत.

ही परिस्थिती सुधारण्यासाठी शासनाने आणि संबंधित तेल कंपन्यांनी तातडीने हस्तक्षेप करून इंधन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी इंधन विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande