बीड : रमाई आवास योजनेअंतर्गत ८१० घरकुलांना प्रशासकीय मान्यता
बीड, ०४ मे (हिं.स.) : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील बेघर कुटुंबांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील ८१० लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रशासकीय मान्यता दिली आह
बीड : रमाई आवास योजनेअंतर्गत ८१० घरकुलांना प्रशासकीय मान्यता


बीड, ०४ मे (हिं.स.) : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील बेघर कुटुंबांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील ८१० लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यासाठी २० कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्याला ३० चौरस मीटरचे घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. जिल्ह्यासाठी एकूण ९८० घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्राप्त प्रस्तावांच्या छाननीनंतर ८१० लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे.

अंबाजोगाई शहराला यामध्ये सर्वाधिक २७८ घरकुलांचा लाभ मिळाला असून, या यशामागे आमदार नमिता मुंदडा यांचे विशेष सहकार्य आणि नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग यांच्या माध्यमातून हा निधी संबंधित नगरपरिषदांकडे वर्ग केला जाणार असून, अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

या निर्णयामुळे जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना स्थिर निवारा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, ग्रामीण व शहरी भागातील घरकुल योजनांना गती मिळणार आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande