कवी प्रशांत मोरे यांच्या काव्यगायनाने रंगली मैफल; विकास भारती शाळेत ‘भीम पर्व’ उत्साहात
परभणी, 04 मे (हिं.स.)। वांगी रस्त्यावरील हडको परिसरातील विकास भारती प्राथमिक शाळेत ‘भीम पर्व... अभिवादन!’ हा उपक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रसिद्ध कवी प्रशांत मोरे (ठाणे) यांच्या काव्यगायनाने वातावरण भारावून गेले. ‘काठ तू,
Q


परभणी, 04 मे (हिं.स.)।

वांगी रस्त्यावरील हडको परिसरातील विकास भारती प्राथमिक शाळेत ‘भीम पर्व... अभिवादन!’ हा उपक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात प्रसिद्ध कवी प्रशांत मोरे (ठाणे) यांच्या काव्यगायनाने वातावरण भारावून गेले. ‘काठ तू, पाण्याची लाट मी, मनाच्या सागरी कुठली दरी आहे, अरे मी तुझा, तू माझा खांदेकरी आहे...’ अशा ओळींनी सुरू झालेल्या भीमगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सादरीकरणाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भीमराव खाडे होते. यावेळी कृषीभूषण कांतराव झरीकर, इंजिनिअर नारायण चौधरी, केशव अण्णा दुधाटे, शेतकरी संघटनेचे शेख जाफर तरोडेकर, डिघोळे तसेच दि. फ. लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या प्राचार्य डॉ. विठ्ठल घुले, डॉ. सुरेश शेळके, कवी यशवंत मकरंद, कवी डॉ. सुरेश हिवाळे, कथाकार बबनराव आव्हाड, राजेंद्र गहाळ, मुख्याध्यापक अविनाश मालसमिंदर, नितीन देशमुख, बालाजी मोहिते, डॉ. सुनील धापसे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

युवकांनी विधायक उपक्रमासाठी पुढे यावे......

भीम पर्व हा उपक्रम युवकांना महापुरुषांच्या विचारानुसार वाटचाल करण्याची प्रेरणा देणारा आहे. शिक्षणातूनच सर्वांचा उत्कर्ष होतो. एक चारित्र्यसंपन्न, व्यसनमुक्त युवकच सशक्त राष्ट्राचे निर्माण करतो. यासाठी महापुरुषांचे विचार पुढच्या पिढीला कळणे गरजेचे असते. . त्यामुळे युवकांनी विधायक उपक्रमासाठी पुढे यावे. असे प्रतिपादन भीम पर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भीमराव खाडे यांनी केले.

भीम पर्व उपक्रम माणूस जोडणारा...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच महापुरुषांनी समतेची शिकवण दिली. माणसाकडे माणूस म्हणून पाहिले पाहिजे. सर्वांनी माणूस म्हणून जगले पाहिजे हे सांगितले. भीम पर्व उपक्रम माणूस जोडणारा आहे. विकास भारती प्राथमिक शाळेतून घडणारे विद्यार्थी महापुरुषांच्या विचारांचा ज्ञानप्रकाश सर्वदूर पोहचवून महापुरुषांच्या स्वप्नातील राष्ट्र घडवतील. असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे प्रसिद्ध कवी प्रशांत मोरे (ठाणे) यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande