अमरावतीत तीन दिवस हवामान विभागाचा ‘येलो अलर्ट’
अमरावती, ४ मे (हिं.स.): प्रचंड उकाड्यानंतर अमरावती जिल्ह्यात हवामानाने अचानक करवट घेतली असून पुढील तीन दिवस वादळी परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने ४ ते ६ मे दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा ‘येलो अलर्ट’ ज
जिल्ह्यावर तीन दिवस ‘वादळी’ संकट!


अमरावती, ४ मे (हिं.स.): प्रचंड उकाड्यानंतर अमरावती जिल्ह्यात हवामानाने अचानक करवट घेतली असून पुढील तीन दिवस वादळी परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने ४ ते ६ मे दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.

या कालावधीत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून दुपारनंतर ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः कच्ची घरे, झाडे, वीजवाहिन्या तसेच शेतातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भासह अमरावती जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या अवकाळी बदलामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून काढणीस आलेली उन्हाळी पिके, भाजीपाला आणि साठवलेले धान्य सुरक्षित ठेवण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

तसेच, विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली उभे राहू नये, उघड्या मैदानात जाणे टाळावे आणि मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा, अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पुढे गेल्यानंतर आता हवामानात झालेल्या या अचानक बदलामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande