
छत्रपती संभाजीनगर, 04 मे (हिं.स.)।
जीवन प्राधिकरणाकडून नवीन योजनेतून पहिल्या टप्प्यात शहरासाठी २०० एमएलडी (दशलक्ष लिटर) पाणी आणले जाणार आहे. मेपासून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, नक्षत्रवाडीतील जलशुद्धीकरण केंद्रासह अनेक तांत्रिक कामे सध्या संथगतीने सुरू आहेत. शिवाय, जलशुद्धीकरणासाठी लागणारे केंद्राचे प्रमाणपत्रही मिळणे बाकी आहे. त्यामुळे आता नवीन योजनेतून जूनमध्येच पाणी मिळेल, अशी सध्यातरी स्थिती आहे.
मुख्य जलवाहिनीतून नक्षत्रवाडी येथे पाणी
आणल्यानंतर योजनेची विविध तांत्रिक कामे रेंगाळली आहेत. शहरासाठी सुरवातीला १५०० मिलिमीटर व्यासाच्या नवीन जलवाहिनीतून पाणी दिले जाईल. त्यासाठी नक्षत्रवाडी येथे रॉ-वॉटर हे मेन रायझिंगमधून जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाईल. त्यासाठी पाण्यात क्लोरिन, तुरटीची मात्रा किती प्रमाणात मिसळावी, यासाठी केंद्रीय पेसो (पेट्रोलियम अॅण्ड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन) चे प्रमाणपत्र घ्यावे लागेल. परंतु, हे प्रमाणपत्र कंपनीने अद्याप मिळविलेले नाही. तसेच मुख्य जलवाहिनीवर बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसवावे लागतील. स्कोअर व्हॉल्व्हदेखील
बदलावे लागणार आहेत. अनेक ठिकाणी जलवाहिनी जोडणीचे काम रखडले आहे, ही कामे पूर्ण करण्यास अजून महिनाभराचा अवधी लागू शकतो
दरम्यान, पाण्याच्या टाक्यांना अंतर्गत जलवाहिन्या जोडण्याचे काम अजून बाकी आहे. हे काम गतीने पूर्ण झाल्यानंतरच १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची हायड्रॉलिक चाचणी घ्यावी लागेल. मे महिन्यात ही कामे पूर्ण करावी लागतील. तरच शहरात पाणी आणता येईल.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis