बालवयातील संस्कार भविष्यातील वाटचालीसाठी लाभदायक ठरतात : डॉ. ऋचा कुलकर्णी
परभणी, 04 मे (हिं.स.)। बालवयात झालेले संस्कार हे अतिशय अनमोल असून भविष्यात यशस्वी व आनंदी जीवन व्यतीत करण्यासाठी त्याचा लाभ बालकांना निश्चितच होतो, असे मत डॉ. ऋचा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. बालकांमध्ये संस्कार, सामर्थ्य, सदाचार व सेवा या चतु:सुत
बालवयातील संस्कार भविष्यातील वाटचालीसाठी लाभदायक ठरतात : डॉ. ऋचा कुलकर्णी


परभणी, 04 मे (हिं.स.)।

बालवयात झालेले संस्कार हे अतिशय अनमोल असून भविष्यात यशस्वी व आनंदी जीवन व्यतीत करण्यासाठी त्याचा लाभ बालकांना निश्चितच होतो, असे मत डॉ. ऋचा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

बालकांमध्ये संस्कार, सामर्थ्य, सदाचार व सेवा या चतु:सुत्रीच्या आधारे भारतीय संस्कृतीची मुल्ये रुजवण्यासाठी विश्वमांगल्य बालसभेच्या वतीने आयोजित केलेल्या ग्रीष्मकालीन शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. विश्वमांगल्य बालसभेच्या मार्गदर्शिका डॉ. जया बंगाळे यांनी या शिबिरासाठी विविध अभिनव उपक्रमांची आखणी करत या सभेच्या कार्यकर्त्यांच्या सहभागातून हे शिबिर यशस्वीरीत्या राबवले.

या शिबिरादरम्यान बालकांसाठी ध्यान, सर्वांगसुंदर व्यायाम, योग, प्राणायाम, स्तोत्र व श्लोक पठण, मनोरंजक खेळ, गाणी व गोष्टी, सृजनात्मक कार्ये, सामान्य ज्ञान, जीवन कौशल्ये विकसन आदी उपक्रम घेण्यात आले. याबरोबरच पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या हेतूने त्यांना गृहपाठ देखील देण्यात आले. कडक उन्हाळ्यात पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी बालकांनी जलदूत होऊन घराच्या परिसरात, बाल्कनीत, गच्चीवर पक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहित केले.

या शिबिराच्या समारोपप्रसंगी व्यासपीठावर विश्वमांगल्य सभेच्या देवगिरी प्रांत संयोजिका प्रीती वैद्य, विशेष अतिथी मंजुषा करभाजन आणि डॉ. जया बंगाळे यांची उपस्थिती होती. महान भारतीय संस्कृतीप्रमाणे जीवनचर्या अंगीकारण्यासाठी भाषा, भूषा, भवन, भोजन, भ्रमण व भजन अशा सहा मभफ बाबत सजग राहून स्वतःच्या बालकांचा, कुटुंबियांचा, समाजाचा व पर्यायाने राष्ट्राच्या विकासास कसा हातभार लावावा याविषयीचे सखोल मार्गदर्शन याप्रसंगी डॉ. जया बंगाळे यांनी उपस्थित पालक व बालकांना केले.

आजचा बालक म्हणजेच उद्याच्या भारताचा नागरिक असल्याने तो जर आदर्श घडला तर आपल्या भारत देशाचे भविष्य निश्चितच उज्वल असेल, असे मत या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी मंजुषा करभाजन यांनी व्यक्त केले. यावेळी शिबिरामध्ये अवगत केलेल्या विविध कलागुणांचे शिबिरार्थ्यांनी अप्रतिम सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.

या शिबिराच्या सर्व लाभार्थी बालकांना प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करून, तर विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. गत 10 वर्षांपासून दर उन्हाळ्यात अशी विशेष शिबिरे विश्वमांगल्य सभेच्या वतीने मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात येत असून जास्तीत जास्त बालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन याप्रसंगी प्रीती वैद्य यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande