
नाशिक, 04 मे (हिं.स.) । पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडी आणि निवडणूक निकालांनंतर भारतीय जनता पक्षाच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी राज्यातील परिस्थितीवर भाष्य करत ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळावर टीका केली.
केदार यांनी पश्चिम बंगालमध्ये अराजक, भ्रष्टाचार आणि कायदा-सुव्यवस्थेच्या समस्या वाढल्याचा आरोप करत, तेथील प्रशासन अपयशी ठरल्याचे मत मांडले. तसेच मतदार याद्यांच्या शुद्धीकरण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात नावे वगळली गेल्याचा उल्लेख करत त्यांनी घुसखोरीच्या मुद्द्यावरही चिंता व्यक्त केली.
त्यांनी असेही सांगितले की, पश्चिम बंगालच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी भाजप पुढे काम करेल.
या प्रतिक्रियेनंतर नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर ढोल-ताशांच्या गजरात, फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, महापौर हिमगौर आडके-आहेर, तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, निवडणूक निकाल आणि पश्चिम बंगालमधील राजकीय परिस्थितीबाबत विविध पक्षांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असून, अधिकृत निकाल आणि चित्र अद्याप चर्चेचा विषय आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV